Sun, May 31, 2020 03:50होमपेज › Marathwada › पुलवामा हल्‍ल्‍यात बुलडाण्यातील दोन जवान शहीद

पुलवामा हल्‍ल्‍यात बुलडाण्यातील दोन जवान शहीद

Published On: Feb 15 2019 3:32PM | Last Updated: Feb 15 2019 3:32PM
बुलडाणा : पुढारी ऑनलाईन

जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्‍या दहशतवादी हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले आहेत. यात बुलडाण्यातीलही दोन जवान शहीद झाले आहेत. नितीन राठोड आणि संजय राजपूत अशी शहीद जवानांची नावे आहेत. 

संजय राजपूत हे बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील आहेत. त्‍यांना ४ भाऊ, १ बहीण, दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. ते सीआरपीएफच्या 115 बटालियनचे जवान होते. नितीन राठोड लोणार तालुक्यातील या चोरपांग्रा गावातील आहेत. चोरपांग्रा या गावात नितीन राठोड नावाच्या दोन व्यक्ती असून दोघेही सीआरपीएफमध्येच आहेत. त्यामुळे गावात संभ्रमाचे वातावरण आहे. 

‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरानजीक असलेल्या गोरीपोरा या ठिकाणी घडवून आणलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ४२ जवान शहीद झाले आहेत. ४० जवान जखमी झाले आहेत. देशभरातून या हल्‍ल्‍याचा निषेध व्यक्‍त केला जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जशास तसे उत्‍तर देण्यात येईल, असा इशारा पाकिस्‍तानला दिला आहे. सीआएपीएफनेही ट्विट करुन या हल्‍ल्‍याचा बदला घेण्यात येईल असे म्‍हटले आहे.