Sun, Jun 07, 2020 15:34होमपेज › Marathwada › #Women’sDay प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलिस दलात संगीता वाघमारे

#Women’sDay प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलिस दलात संगीता वाघमारे

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 2:06AMजिंतूर : बालाजी शिंदे 

शहरातील पोलिस ठाण्यात दामिनी पथकाची निर्मिती होताच आपली वेगळी ओळख निर्माण करून रोडरोमियो, धूम स्टाईल दुचाकी चालवणार्‍यांचा कर्दनकाळ ठरलेल्या लेडी दबंग पोलिस शिपाई संगीता वाघमारे या महिलांसाठी आदर्श ठरत आहेत.

मूळच्या नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील संगीता वाघमारे यांचे वडील पोलिस खात्यात नोकरीस असताना त्यांचे अकाली निधन झाले. त्यावेळी 5 अपत्यांंची जबाबदारी आईवर येऊन पडली होती. आपणही आईला हातभार लावावा म्हणून संगिताने शाळेतून जसा वेळ मिळेल तसे काम करून 12 वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून लग्न झाल्यावर दोन मुलींच्या जन्मानंतर घरसंसार करत सकाळी 3 वाजता उठून पोलिस भरतीचा सराव केला. याच मेहनतीला फळ येऊन वयाच्या 29 व्या वर्षी त्या शिपाई पदावर त्या 
रुजू झाल्या. 

 जिद्दीने त्यांनी यश संपादन केले. आजही त्या आपले कर्तव्य बजावत घरसंसार सांभाळत आहेत.
जिंतूर ठाण्यात 2015 साली त्या रुजू झाल्या यावेळी प्रामाणीक काम करत असल्याने मार्च 2017 साली ठाण्यात दामिनी पथकाची स्थापना झाली व त्या पथकाचा प्रमुख झाल्या पथकाची स्थापना होताच त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला.  त्यांनी तालुक्यासह व शहरातील शाळा, महाविद्यालयात जाऊन फेसबुक, वॉट्सअ‍ॅप व इंटरनेटचा वापर कशा प्रकारे करायचा, पोलीस खात्याबाबत तसेच मुलींची छेडछाड रोखण्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच मुलींनी रोडरोमियोना कसा धडा शिकवायचा यासाठी कराटे प्रशिक्षण देऊन त्या माहिती देत. त्याचबरोबर महिलांचा शारीरिक व मानसिक छळाचे, हुंड्याचे प्रकरण समुपदेशनाने सोडविले आहेत. त्या नेहमी शाळा व महाविद्यालय परिसरात तसेच बसस्थानकात जाऊन टवाळक्या करणार्‍यांसह मुलींची छेडछाड करणार्‍यांवर जागेवरच कार्यवाही करत असत. त्यामुळे रोडरोमियोंवर मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यांच्या पथकात फौजदार सुरेश नरवाडे,पूजा जाधव आहेत. त्यांना पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल कांबळे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे हे मार्गदर्शन करत असतात.