Wed, Jun 03, 2020 09:30होमपेज › Marathwada › परळी : राष्ट्रवादी आणि काँग्रेस थकलेले विरोधक; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

परळी : राष्ट्रवादी आणि काँग्रेस थकलेले विरोधक; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

Last Updated: Oct 17 2019 1:39PM
परळी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी परळीत सभेला संबोधित केले. बीड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यावेळी विजयाचा विक्रम करा, असे आवाहन करत पंतप्रधान मोदींनी बीड जिल्ह्यात प्रत्येक वेळी कमळ फुलले. यावेळी सर्व रेकॉर्ड तुटतील, असा दावा केला. 

विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी, राष्ट्रवादी -काँग्रेस थकलेले विरोधक आहेत, असे म्हटले. थकलेल्या, आत्मविश्वास हरवलेल्या विरोधकांकडून काय अपेक्षा धरायची. भाजप महायुतीची कार्यशक्तीच देशाला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

भाजप महायुतीकडून लोकांना अपेक्षा आहेत; त्या पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले.

प्रचारसभेच्या सुरूवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी आपल्‍या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. मी आज परळी वैजनाथ आणि माझे मित्र गोपीनाथ मुंडेच्या कर्मभूमीत आलो आहे. या ठिकाणी देव आणि या विराट जनसमुदायाचे एकत्रित दर्शन झाल्‍याच ते म्‍हणाले. 

इतिहासात कलम ३७० चा विषय निघेल; तेव्हा कलम ३७० मुद्याची चेष्टा व विरोधी टीका टिप्पणी करणाऱ्यांचीही नोंद होईल. अनेकांनी अनेक प्रकारे कलम ३७० चा विरोध केला. लोकतंत्र संपले अशी आवई उठवली गेली. तुम्हीच सांगा देशातील लोकतंत्र संपली का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला.

देश तर देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना धडा शिकवणारच आहे. आज महाराष्ट्राला ही संधी आली आहे. कलम ३७० ची खिल्‍ली उडवणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला घरी बसवा, असेही ते म्हणाले.

मराठवाडा व महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. मराठवाड्यात वॉटरग्रीड ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र शासन शेतकरी, शेतमजूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यासाठी महाराष्ट्र शासन अभिनंदनास पात्र आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली. दलालराज खत्म केले, असे त्यांनी सांगितले.