Mon, Jun 01, 2020 19:28
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › रोपे रस्त्यावर, लागवड मात्र कागदावर!

रोपे रस्त्यावर, लागवड मात्र कागदावर!

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 12:33AMबीड : दिनेश गुळवे

जिल्ह्यात 80 लक्ष 42 हजार 28 रोपांची लागवड केल्याचा वनविभाग डंका पिटत आहे. राज्यभरात गाजावाजा केला जात असलेल्या या वृक्षलागवडीचे वास्तव काही वेगळेच असून काही ठिकाणी हजारो झाडे, रस्त्याच्या कडेला फे कून दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. लागवडीविना रोपे रस्त्याच्या कडेला तशीच ठेवली जात असल्याने रोपे रस्त्यावर अन् लागवड कागदावर असा काहीसा प्रकार 80 लक्ष वृक्ष लागवडीचा झाला नाही ना, असा प्रश्‍न वृक्षमित्रांमधून उपस्थित केला जात आहे.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासह संतुलन राखण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. शासकीय कार्यालय, शाळा, सामाजिक संस्था, महाविद्यालय, ग्रामपंचायत आदींकडून हे वृक्षारोपण केले जाते. यावर्षीही बीड जिल्ह्यात लाखांवर रोपटे लावण्यात आली. यासाठी एक ऑगस्ट पासून सप्ताह साजरा करण्यात आला. असे असले तरी यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणची रोपे जळून गेली आहेत. काही ठिकाणी केवळ कागदोपत्री वृक्षारोपण केले जात आहे, तर काही ठिकाणी लावलेल्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी जाळी न बसविल्याने अशा रोपांवर शेळ्यांसह इतर जनावरे ताव मारीत आहेत. 

वृक्षारोपणाचे काही ठिकाणी असे चित्र असले तरी काही ठिकाणी मात्र वृक्षांची जोपासणा काळजीने केली जात आहे. बीड जवळील पांगरी रोडलगत जवळपास दोनशेवर रोपटे रोडच्या बाजूला पडलेले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून येथे हे रोपटे असल्याने हे कधी लावण्यात येणार असा प्रश्‍न आहे. या रोपट्यांना ना पाणी घालण्यात आले, ना पाऊस पडला, यामुळे यातील अनेक रोपटे कोमेजून गेली आहेत. 
मोठ्या प्रमाणावर रोडलगत अशी रोपटे पडल्याने वृक्षारोपणाबाबत किती सजगता व गांभीर्य आहे? हेही समोर आले आहेत. 

वनविभागात उजळ माथ्याने भ्रष्टाचार सुरू

80 लक्ष वृक्ष लागवडीचा दावा करून पाठ थोपटून घेणार्‍या वनविभागातील एक अधिकारी आणि दोन कर्मचार्‍यांना मागील आठवड्यात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. वनविभागात भ्रष्टाचार उजळ माथ्याने सुरू असल्याचा पुरावा या प्रकरणाने स्पष्ट झाला. दरम्यान, 80 लक्ष वृक्ष लागवडीतील रोपे रस्त्याच्या बाजुला फे कून दिल्याचे पुढे आले आहे. हा नेमका काय प्रकार आहे? 80 लक्ष वृक्ष लागवडीचा आकडा भ्रष्टाचार करून फु गवला तर नाही ना, असा सवाल वृक्षमित्रांमधून उपस्थित केला जात आहे.