Sun, Jun 07, 2020 07:16होमपेज › Marathwada › वैयक्‍तिक शौचालयाचे ४ लाखांचे अनुदान एकालाच

वैयक्‍तिक शौचालयाचे ४ लाखांचे अनुदान एकालाच

Published On: Mar 15 2018 10:13PM | Last Updated: Mar 16 2018 1:22AMगंगाखेड : प्रतिनिधी

नगर परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्‍तिक शौचालय बांधकाम निधीचा दुसरा टप्पा 134 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा न होता आयडीबीआय बँकेने चक्‍क एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर 4 लाख 2 हजार रुपये जमा केल्याचा प्रकार उघडकीस येताच बँकेची एकच धावपळ उडाली.

स्वच्छ भारत अभियान केंद्र शासनाने ग्रामीण भागासह शहरी भागात जोमाने राबवून स्वच्छ शहर सुंदर शहर करण्याची स्पर्धा आयोजित करत यावर कोट्यवधींचा निधी देण्यात येत आहे. गंगाखेड नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरात प्रत्येक प्रभागात सार्वजनिक शौचालयाची नव्याने उभारणी करत घर तिथे शौचालय अभियानांतर्गत 3075 वैयक्‍तिक शौचालयाचे उद्दिष्टापैकी 1705 शौचालय बांधकाम पूर्ण होऊन लाभार्थ्यांना अनुदान वाटप झाले. हे अनुदान तीन टप्प्यांत संबंधित व्यक्‍तीच्या खात्यावर जमा केले जात असते. 

उर्वरित 1370 शौचालयाचे बांधकाम प्रगती पथावर असल्याने 356 वैयक्‍तिक शौचालय बांधकाम निधी दुसरा टप्प्याच्या रक्‍कमेचे 10 लाखांचे तीन चेक 29 जानेवारी रोजी आयडीबीआय बँकेत जमा करून लाभार्थी याद्या देत वर्ग करण्यासाठी सूचविण्यात आले होते. बँकेने 2 फेब्रुवारी रोजी न. प. ने दिलेल्या 134 लाभार्थ्यांच्या यादीतील अमजतखाँ पठाण यांच्या खात्यावर चक्‍क संपूर्ण लाभार्थीचे अनुदान वर्ग केले. इतर 133 लाभार्थींना अनुदान न मिळाल्याने त्यांनी न. प. त तक्रार केल्याने याबाबतची चौकशी बँकेत केली असता हा प्रकार उजेडात येताच बँकेत एकच धावपळ सुरू झाल्याचे पाहावयास मिळाले होते; पण संबंधित लाभार्थी यांच्या बँक खात्यावर वर्ग झालेली वैयक्‍तिक शौचालयाची रक्‍कम परत मिळविण्यासाठी सदरील बँकेने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. संबंधित लाभार्थ्यानी पैसे परत करण्याची हमी दिली; पण पैसे कधी जमा होणार यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला असल्याचे सुजाण नागरिकांतून बोलल्या जात आहे.

नगर परिषदेने वैयक्‍तिक शौचालय लाभार्थी यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी देण्यात आलेले चेक व लाभार्थी यादीतील एका व्यक्‍तीच्या नावावर 4 लाख 2 हजारांची रक्‍कम चुकून वर्ग करण्यात आली. ही चूक आमची आहे हे मान्य आहे. चुकून गेलेली रक्‍कम संबंधित लाभार्थी लवकर परत करणार आहे. त्यांच्या संर्पकात बँक आहे.
- मोहित खैरनार, असिस्टंट मॅनेजर, आयडीबीआय बँक, गंगाखेड.

नगर परिषदेने वैयक्‍तिक शौचालय बांधकामाच्या दुसर्‍या टप्प्याच्या अनुदानाचे चेक व लाभार्थी यादी बिनचूक दिलेली असताना बँकेकडून झालेली चूक अक्षम्य आहे. यास बँक जवाबदार आहे. सदरील रक्‍कम बँकेने त्वरित वसुल करून लाभार्थी यांच्या खात्यावर वर्ग करण्याची जबाबदारी बँकेची आहे.
- शेख मुजीब, उपमुख्याधिकारी, न. प. गंगाखेड.