Thu, Oct 17, 2019 13:41



होमपेज › Marathwada › परळी पाणी टंचाईस पंकजाताई जबाबदार : धनंजय मुंडे 

परळी पाणी टंचाईस पंकजाताई जबाबदार : धनंजय मुंडे 

Published On: Jul 19 2019 5:20PM | Last Updated: Jul 19 2019 5:20PM




परळी : प्रतिनिधी

परळीच्या भाजप आमदारांनी  स्वतःच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला वाण धरणातून अमर्यादित पाणी घेतल्यामुळेच परळी शहराला पाण्याची टंचाई भासत असून पाण्याअभावी परळीकरांच्या होणाऱ्या हाल अपेष्टांना त्याच जबाबदारी आहेत असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केला. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ ते २२ जुलै दरम्यान विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत आज (दि.१९जुलै) लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे वॉटर व्हिलर वितरण समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.

'स्वतःच्या वैद्यनाथ कारखान्याला परळीचे पाणी घेतले, मात्र शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले नाहीत आणि परळीकरांचे पाणीही पळवले, असा आरोप करून नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा वाटप करण्यापेक्षा पालकमंत्री आणि या भागाच्या आमदार म्हणून परळीतल्या जनतेला पाणी देण्यासाठी त्यांनी काय केले असा सवालही मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला.

वान धरण कोरडे पडले असतानाही नगरपालिका 80 टँकरने पाणीपुरवठा करत आहे. आपण स्वतः नाथ प्रतिष्ठानच्या वतीने पंधरा लाख रुपये नगरपालिकेला दिले. नाथ प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स्वखर्चाने पाणीपुरवठा करत आहेत याचा आपल्याला अभिमान वाटतो असेही मुंडे म्हणाले.

समाजातील प्रत्येक घटकांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी माझे सहकारी सातत्याने आधार देतात, याचा आनंद वाटतो असे सांगून वॉटर व्हिलर वितरणाचा उपक्रम घेण्याची वेळ येऊ नये, परंतु भीषण पाणी संकटच इतके झाले आहे की, सर्वच जलसाठे संपले आहेत. या परिस्थितीत पाणी वाहून आणण्यासाठीचा आपल्या डोक्यावरील भार वॉटर व्हिलर वितरण करुन कमी करण्याचा प्रयत्न आहे. परळी शहराला खडका बंधाऱ्यातून पाणी पुरवठा करण्यासंदर्भात सातत्याने आपण सरकारकडे पाठपुरावा केला असून हे पाणी आपल्याला लवकरच उपलब्ध होईल असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.