Mon, Jun 01, 2020 18:06
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › हिंगोली : भाजपच्या विस्तारक योजनेला ‘वन बूथ 20 यूथ’ने उत्तर

हिंगोली : भाजपच्या विस्तारक योजनेला ‘वन बूथ 20 यूथ’ने उत्तर

Published On: Aug 06 2018 10:52AM | Last Updated: Aug 06 2018 10:52AMगजानन लोंढे

लोकसभा निवडणुकीसाठी आठ महिन्यांचा अवधी असला तरी आतापासूनच प्रमुख पक्ष असलेल्या भाजप व काँग्रेसने बूथस्तरावर यंत्रणा उभी करण्याचे नियोजन केले आहे. भाजपने मागील वर्षभरापासून विस्तारकाच्या माध्यमातून गावोगावी बूथ बळकट केले आहेत. भाजपच्या या संघटन कौशल्याला छेद देण्यासाठी काँग्रेसनेही वन बूथ 20 यूथच्या माध्यमातून गावोगावी संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच जिल्ह्यात शक्‍ती अ‍ॅपद्वारे कार्यकर्त्यांची नोंदणी सुरू केली आहे. भाजप व काँग्रेसकडून पक्षबांधणी जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडूनही विधानसभानिहाय नियोजन सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत परस्पर विरोधक म्हणून काँग्रेस व भाजप या दोन प्रमुख पक्षांकडे पाहिले जाते. दोन्ही पक्ष राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या नियोजनानुसार जिल्ह्यात संघटन मजबुतीचे काम सुरू आहे. मागील वर्षभरापासून भाजपने गावपातळीवर बूथनिहाय नियोजन सुरू केले आहे. यासाठी लोकसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र विस्तारक नेमला आहे. तसेच विधानसभा मतदारसंघासाठी एक स्वतंत्र विस्तारक
देऊन पक्षबांधणीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. हिंगोलीत एक लोकसभा व तीन विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपने चार विस्तारकांची नेमणूक करून गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपने यापूर्वीच वन बूथ टेन यूथचा कार्यक्रम राबवून काँग्रेसच्या पुढे आव्हान उभे केलेले असतानाच पुन्हा भाजपने पन्ना प्रमुख ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. या संकल्पनेच्या
माध्यमातून गावातील मतदार यादीमधील पहिल्या पानावरील पहिल्या नावाला प्रमुख करून त्यांच्यामार्फत संपर्क वाढविला जाणार आहे. तसेच गावातील प्रतिष्ठांची नावे संकलित करून ती प्रदेश कार्यालयात पाठविली जात आहेत. त्या यादीमध्ये सर्व जाती-धमार्र्ंतील मतदारांचा समावेश केला जात आहे.

भाजपकडून सर्व समावेशक कार्यकर्ते जोडण्याचे काम केले जात असल्यामुळे काँग्रेसलाही खडबडून जाग आली आहे. प्रदेश स्तरावरून आलेल्या आदेशानुसार खा. राजीव सातव संजय बोंढारे, आ. डॉ.संतोष टारफे यांच्या माध्यमातून नियोजन सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबरोबरच शक्‍ती अ‍ॅपद्वारे काँग्रेसने नोंदणी सुरू केली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य सुशिक्षित मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

काँग्रेस, भाजपकडून बूथ पातळीवर लक्ष केंद्रित केले जात असताना राष्ट्रवादी व शिवसेनेकडून मात्र या दोन्ही पक्षांच्या तोडीस तोड प्रयत्न अद्याप तरी सुरू नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय पदाधिकार्‍यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासंदर्भात कार्यक्रम देण्यात आला असला तरी अजून म्हणावी तशी प्रगती झाल्याचे दिसून येत नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी केवळ कळमनुरीवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुनीच टिम कायम ठेवण्यात आली आहे.