Thu, Jun 04, 2020 21:43होमपेज › Marathwada › अपशब्द वापरल्याप्रकरणी सय्यद साजिदला अटक

अपशब्द वापरल्याप्रकरणी सय्यद साजिदला अटक

Published On: Apr 19 2019 9:56PM | Last Updated: Apr 19 2019 9:56PM
अहमदपूर (जि. अहमदपूर) प्रतिनिधी

मराठा समाजाबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी अहमदपूर येथील साजिद सय्यद यास पोलिसांनी  अटक केली असून त्याच्यावर अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास  न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याचा जामीन  फेटाळला आहे. 

साजिद याने १४ एप्रिल रोजी एका मेळाव्यात केलेल्या भाषणात मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले होते. त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली होती.  याच्या निषेधार्थ १९ एप्रिल रोजी सकल मराठा समाजाने अहमदपूर बंदचे आवाहन करून साजीद सय्यद याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

गुरुवारी बंद दरम्यान दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. तथापि पोलिसांनी तो नियंत्रणात आणला व तात्काळ साजिद याला अटक केली.  त्यामुळे २० एप्रिल रोजी मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेला लातूर जिल्हा  बंदचा निर्णय समाजाच्या वतीने स्थगित करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून संबंधितास अटक करण्यात आली आहे. तणाव निर्माण होईल  असे कृत्य  कोणीही करू नये  आणि अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी.

     डॉ.आश्विनी शेलार -पाटील  उपविभागीय पोलिस अधिकारी, अहमदपूर