Wed, Jun 26, 2019 15:38होमपेज › Marathwada › प्रधानमंत्री आवास योजनेचा कक्ष बेवारस 

प्रधानमंत्री आवास योजनेचा कक्ष बेवारस 

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 1:36AMमाजलगाव : प्रतिनिधी

येथील नगर पालिकेत शहर हद्दीत असणार्‍या बेघर नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे, परंतु या योजनेचे अर्ज स्विकारणार्‍या कक्षात गत आठ दिवसांपासून कर्मचारीच नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

देशात कुणीच बेघर राहू नये म्हणून विविध घटकांसाठी शासनाने योजना सुरू केल्या आहेत.  शहरी भागातील बेघरांसाठी  प्रधानमंत्री घरकूल योजना संपूर्ण देशात राबवली जात आहे.  माजलगाव नगरपालिकेतही यासाठी कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. अर्ज वितरण व स्वीकृतीचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आलेले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नगर पालिकेत एक कक्ष उघडला असून या कक्षामार्फत विविध हेड खाली येणारे विशेष अर्ज वितरित करण्यात आले आहेत. शहरातील हजारो बेघर नागरिकांनी कागदपत्र, बॉन्ड, नोटरीसाठी खर्च केला आहे. अर्जाबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करून तो दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांना या कक्षात कोणीच नसल्याचे दिसत आहे. गत आठ दिवसांपासून ही परिस्थिती आहे. नगरपालिकेत विचारणा केली तर संबंधीत संस्थेच्या कर्मचार्‍याकडेच अर्ज द्यावयाचा आहे असे सांगितले जाते. यामुळे नागरिकांना नगरपरिषदेत चकरा माराव्या लागत आहेत.