Sun, Oct 20, 2019 16:49होमपेज › Marathwada › साखरा परिसरातील १६ गावे अंधारात

साखरा परिसरातील १६ गावे अंधारात

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:38AMसाखरा : प्रतिनिधी

सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरात शनिवारी दि.7 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, तेव्हापासून ते रविवारी दि.8 एप्रिलच्या सकाळी दहा वाजेपर्यत साखरा परिसरातील 16 गावांतील नागरिकांना आपली रात्र अंधारात काढावी लागली. महावितरणच्या गलथान कारभारामुळे मात्र नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.

साखरा परिसरात शनिवारच्या दुपारी चार वाजता वादळी वार्‍यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. तेव्हापासून ते रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत साखरा परिसरातील 16 गावांतील विद्युत पुरवठा खंडित होता. यात विशेष म्हणजे या भागात थोडा जरी वारा किंवा पाऊस झाला तरी या भागातल्या गावांना रात्र अंधारात काढावी लागते. त्यामुळे या भागातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. गेल्या महिन्यापासून तापमानाने चाळीसी ओलाडंली आहे.

त्यातच वीज नसल्यामुळे सर्वांनाच नाहक गरमीचा त्रास सहन करावा लागत आहे. पहिलेच पाणीटंचाई त्यातच शनिवारी रात्रभर वीज नसल्यामुळे रविवारी दिवसभर साखरा परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली. साखरा परिसरात घोरदरी 33 केव्ही केंद्र येथून विद्युत पुरवठा केल्या जातो. वीजपुरवठा काही कारणास्तव खंडित असल्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे.