Sat, Jun 06, 2020 23:43होमपेज › Marathwada › नांदेड जिल्‍हा परिषदेच्या माजी सदस्याची हत्या

नांदेड जिल्‍हा परिषदेच्या माजी सदस्याची हत्या

Published On: Dec 26 2017 6:57PM | Last Updated: Dec 26 2017 6:57PM

बुकमार्क करा

नांदेड : प्रतिनिधी

पैसे देवाण-घेवाणीच्या कारणांवरून एका डॉक्टर व त्याच्या सहकार्‍याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनकर शेवाळे यांची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना मंगळवार दि. २६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन्ही आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले, या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दिनकर शेवाळे यांनी चार वर्षांपूर्वी मारेकरी डॉ. अविनाश शिंदे यांच्याकडून चाळीस ते पन्नास लाख रुपये काही कामासाठी घेतले होते. परंतु,  सदरची रक्‍कम काम झाल्यानंतरही मयत शेवाळे हे परत करत नव्हते. मागच्या दोन ते तीन वर्षांपासून आरोपी डॉ. अविनाश शिंदे हे पैशासाठी पाठपुरावा करत होते. यावरून दोघांमध्ये वादही झाला होता. 

दिलेले पैसे परत करत नसल्याने संतापलेल्या डॉ. अविनाश शिंदे व दुसरा सहकारी सखाराम कुंम्बेकर यांनी शेवाळेचा मारण्याचे निश्चित केले. त्यानुसार मंगळवारी मृत दिनकर शेवाळे यांचे निळा रोड परिसरातील देशमुख कॉलनी येथे घराचे बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी ते गेले. बांधकामावरील वॉचमन महिलेच्या पत्नीस विचारले असता त्यांनी शेवाळे आत असल्याचे सांगितले. दोन्ही मारेकर्‍यांनी घरात प्रवेश करून आतमधून दरवाजा लावून घेत दिनकर शेवाळे यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने सपासप घाव घातले. जवळपास पन्नास ते साठ वार केल्यानंतर आरोपी निघून गेले. यात दिनकर शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस उपाधीक्षका अर्चना पाटील, लिंबगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक सौ. वसुंधरा बोरगावकर यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी मृत दिनकर शेवाळे यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. ते २०१२ ते २०१७ या काळात जिल्हा परिषदेवर भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. अलिकडच्या काळात ते दलित महासंघामध्ये काम करत असत.