Sat, Jun 06, 2020 15:40होमपेज › Marathwada › ­उस्मानबाद : किरकोळ कारणावरुन तरुणाचा खून

­उस्मानबाद : किरकोळ कारणावरुन तरुणाचा खून

Published On: Apr 23 2018 7:40PM | Last Updated: Apr 23 2018 7:38PMउमरगा : प्रतिनिधी 
बावीस वर्षीय युवकाचा मागील भांडणाचा राग मनात धरून तिघांनी संगणमताने धारदार शस्त्राने गळा व पोटावर वार करून खून केल्याची  घटना घडली. सोमवार, दि. 23 रोजी मध्यरात्री साडेबारा ते एकाच्या सुमारास तालुक्यातील दाबका शिवारात (जि. उस्मानाबाद) ही घटना घडली असून याप्रकरणी तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील दाबका येथील राम विश्वनाथ पवार व मेहताब ईस्माइल फकीर हे दोघे ट्रक चालक असून आठ दिवसापूर्वी अभिजीत राम पवार यांनी मेहताब फकीर यास 'तु माझ्या वडिलांसोबत खाणेपिणे करू नकोस' असे म्हटले होते. यावरून दोघांत तक्रार होवून भांडण झाले होते. आठ दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सोमवारी मध्यरात्री साडे बारा ते एकाच्या सुमारास मेहताब ईस्माइल फकीर यांनी मेहबूब ईस्माइल फकिर व मकसूद महेमुदखॉ पटेल तिघेही रा. दाबका यांना सोबत घेवून गावालगत असलेल्या राम पवार यांच्या शेतात जावून अभिजीत राम पवार (वय २२वर्ष) यांच्यावर धारदार शस्त्राने पोटावर व गळ्यावर वार करून खून केला. दरम्यान मेहताब फकीर यांनी राम पवार यांना 'तुला काय करायचे ते करतो’ अशी धमकी दिली. याप्रकरणी राम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मेहताब फकीर, मेहबूब फकीर व मकसूद पटेल यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याचा पोलिस उपनिरिक्षक दिनेश जाधव तपास करीत आहेत. दरम्यान सोमवारी पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ व्यूहरचना आखत महेबूब फकीर व मकसूद पटेल यांच्यासह आणखी एकास ताब्यात घेतले आहे. तर फरार मेहताब फकीर याचा शोध सुरू आहे.

रात्री शेतातकडे रात्री झोपण्यासाठी गेलेल्या अभिजीत यांच्यावर महेताब फकीर याने नजर ठेवून शेतात गाठले. यावेळी अभिजीतने 'इतक्या रात्री कसा काय आला' म्हणून महेताब फकीरला विचारले असता 'शिवारात पार्टी आहे तिकडे जात' असल्याचे सांगून महेताब व सोबत आलेल्या दोघांनी मिळून अभिजीत च्या शरीरावर दहा ते बारा निर्दयपणे धारधार चाकूने सपासप वार करून गळा चिरला.

 राम पवार यांना दोन मुले असून मोठा मुलगा कामानिमित्त पुणे येथे आहे. तर  मयत अभिजीत हा मल्ल होता. परिसरातील कुस्तीच्या दंगलीत अनेक मल्लांना आसमान दाखविले होते. मात्र तिघांनी मिळून दगाबाजीने अभिजीत चा काटा काढल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान अभिजीत च्या हत्येमुळे गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.