Sat, Oct 19, 2019 10:32होमपेज › Marathwada › पंकजा मुंडेंच्या 'या' खेळीने विनायक मेटेंचा पत्ता परस्पर कट

पंकजा मुंडेंच्या 'या' खेळीने विनायक मेटेंचा पत्ता परस्पर कट

Published On: May 22 2019 9:32AM | Last Updated: May 22 2019 9:32AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर आज (ता.२२) सायंकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सुत्रे क्षीरसागर यांच्याकड़े होती. मात्र, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे गेली. त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे देखील त्यांच्यापासून दूर गेले. पक्षातील नेत्यांनीच त्यांना आपल्या विरोधात हवा दिल्याचा राग क्षीरसागर यांना आहे. 

अधिक वाचा : निकालापूर्वीच राष्ट्रवादीला धक्का; जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत प्रवेश करणार 

दरम्यान, विद्यमान आमदार जयदत्त क्षीरसागर हे शिवसनेत जाण्यास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही हातभार लावल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यातून सद्या विस्तवही जात नाही. पंकजा मुंडे यांनी मेटे यांचे तिन्ही जिल्हा परिषद सदस्य फोडून भाजपमध्ये सामील करुन घेतले.

त्यामुळे चिडलेल्या मेटे यांनी महायुतीमध्ये असतानाही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघातील  प्रीतम मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेत राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांचा प्रचार केला. मेटे बीड विधानसभेची आधीपासून तयारी करीत आहेत. अशावेळीच तेथील विद्यमान आमदार असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेत पाठवून पंकजा मुंडे यांनी मेटेंना परस्पर शह दिला आहे.