Thu, Jun 04, 2020 22:19होमपेज › Marathwada › संकटातील दूध उत्पादकांना मिळणार दरवाढीचे टॉनिक

संकटातील दूध उत्पादकांना मिळणार दरवाढीचे टॉनिक

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:33AMबीड : उदय नागरगोजे

संकटात आलेल्या दुग्ध व्यवसायाला सावरण्यासाठी शासनाने पाच रुपये प्रतिलिटर दरवाढ देण्याचा निर्णय घेतला. दि.1 ऑगस्टपासून याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या निर्णयामुळे संकटात असेलल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना टॉनिकच मिळणार आहे. बीड जिल्ह्यात सहा सहकारी व दोन खासगी दूध संघांच्या माध्यमातून जवळपास सव्वा लाख लिटर दुधाचे दररोज संकलन होते. 

बीड जिल्ह्यात पावसाच्या अनियमीततेमुळे शेती बेभरवशाची आहे. शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी पशुपालन करतात. दूध व्यवसायातून उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत निर्माण झालेला आहे, परंतु गत काही महिन्यात दुधाचे दर कमी होत गेल्याने हा व्यवसाय संकटात सापडला होता. दूध उत्पादकांनी केलेल्या आंदोलनानंतर शासनाने दुधाला पाच रुपये दरवाढ देण्याचे जाहीर केले. याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. दुधाला किमान 25 रुपयांचा दर देणे संघांना बंधनकारक करण्यात आले आहे. तर जे दूध अतिरिक्त होईल म्हणजेच दूध भुकटी बनवण्यासाठी जाणार आहे त्यावर शासन पाच रुपयांचे अनुदान संबंधीत उत्पादकांना देणार आहे. तेथून ते दुध संघ आणि त्यानंतर उत्पादकाला मिळणार आहे. बीड जिल्ह्यात संकलित होत असलेले सव्वा लाख लिटर दूध महानंदला जात जात आहे. तर दोन खासगी संघाचे दूध इतरत्र दिले जात आहे. 

सहा सहकारी संघ

बीड जिल्ह्यात सहा सहकारी दुधसंघ आहेत. यामध्ये बीड जिल्हा, बीड तालुका, आष्टी तालुका, गेवराई येथील चिंतामणी, अंबाजोगाई येथील वसुंधरा, परळी तालुका दुधसंघाचा समावेश आहे. तर विमल अ‍ॅग्रो हा लोखंडी सावरगाव येथे खासगी दुधसंघ असून येथील दुध हैदराबादच्या खासगी दूध कंपनीला पाठवले जाते. भारज येथील नंदगोपाळ दूध संघाचे दूध कळंब येथे पाठवले जाते.

जिल्ह्यात 395 संस्था

बीड जिल्ह्यात 395 दूध संकलन संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून गावोगाव दूध संकलित करून संबंधीत संघांना पाठवले जाते. तेथे प्रक्रिया होऊन ते दूध इतरत्र पाठवले जाते. पूर्वी मोठ्या संख्येने दूध संस्था होत्या परंतु यातील 1528 संस्था अवसायानात निघाल्या आहेत.

ऑनलाईन प्रणाली : दुध दरवाढीचा लाभ थेट उत्पादकांना मिळावा यासाठी ऑनलाईन प्रणाली अवलंबण्यात येणार आहे. दुध भुकटी उत्पादकाला शासन पाच रुपये प्रति लिटर अनुदान देणार असून त्याने संबंधीत दुध संघाला किमान पंचवीस रुपये भाव देणे बंधनकारक आहे. दुध संघाला सदरील रक्कम प्राप्‍त होताच ती  दुध उत्पादक शेतकर्‍याच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.