Sun, Jun 07, 2020 08:20होमपेज › Marathwada › लातूर जिल्‍ह्यात अघोषित संचारबंदी

लातूर जिल्‍ह्यात अघोषित संचारबंदी

Published On: Aug 09 2018 1:00PM | Last Updated: Aug 09 2018 1:09PMलातूर : प्रतिनिधी 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सुरू असलेल्या बंदला लातूर शहर व जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सर्व वाहतूक व व्यव्हार कडकडीत बंद असल्याने शहरात अघोषित संचारबंदी लागल्याचा भास होत आहे. प्रमुख मार्गावर आंदोलकांनी ठिय्या दिला असून रस्त्यावर टायर्स जाळून वाहतुकीची कोंडी करण्यात आली. 

 जिल्‍ह्यात मध्यरात्री पासूनच साखरा येथील समाजबांधवांनी रस्त्यावर ठिय्या दिला. शहरात सकाळी सातपासून ‌विविध चौकात आंदोलकांनी बैठक दिली. रस्त्यावर टायर्स व लाकडाचे ओंडके पेटविण्यात आले. सव्वा नऊ वाजता शहरात युवकांनी भ‌व्य रॅली काढली. औषधी दुकाने वगळता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली नाहीत.

गजबजलेल्या बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. भाजी फळबाजार, हातगाडेवाले, अॅटो युनियन, अशा विविध संघटनांनी बंदला प्रतिसाद दिला. रेणापूर, चाकूर, उदगीर, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, जळकोट, देवणी, निलंगा औसा आदी तालुक्यातही उत्सफूर्त जनआंदोलन होत आहे. 

लातूरनजीक वासनगाव फाटा येथील ठिय्या आंदोलनात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी बैठक दिली आहे. अनेक ठिकाणी जागरण गोंधळ, भारुडे, पोवाडे असे कार्यक्रमही होत आहेत. आंदोलकांनी रस्‍त्यावर खाट टाकून बैठक दिली . मराठा आमदारांच्या निष्क्रियतेवर जीवंत देखावे करुन आंदोलकांनी त्यांची खदखद व्यक्त करीत आहेत. शहर व जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

रुग्णवाहिकांना वाट, परीक्षार्थींना शुभेच्छा
शहरात वा इतरत्र येणाऱ्या रुग्णवाहिकांना आंदोलनकर्ते स्वत: वाट करुन देत आहेत. परगावहून रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या परीक्षार्थींना तातडीने वाट देऊन त्यांना क्रांती मोर्चाच्यावतीने बेस्ट ऑफ लक करण्यात आले.

मराठा महिलांचा रस्त्यावर स्वंयपाक
लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठी महिलांनी चक्क रसत्यावर चुली मांडल्या असून स्वंयपाक सुरू आहे. झुणका-भाकरी व ठेचा असा मेनू आहे.