Sat, Aug 24, 2019 09:50होमपेज › Marathwada › मराठा क्रांती मोर्चा; आजपासून दुसरे पर्व

मराठा क्रांती मोर्चा; आजपासून दुसरे पर्व

Published On: Jun 28 2018 11:56PM | Last Updated: Jun 29 2018 12:11AMतुळजापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासह इतर न्याय्य हक्‍क आणि प्रलंबित मागण्यांसाठी आज शुक्रवार, दि. 29 जून रोजी सकाळी 11.30 वा. तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर महाद्वारासमोर आई तुळजाभवानीचा जागर गोंधळ घालून आंदोलनाच्या दुसर्‍या पर्वाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरासह परराज्यातील मराठा समाजबांधव तुळजापूरनगरीत पुन्हा नव्याने रणशिंग फुंकून एल्गार पुकारण्यात येणार आहे.

निद्रिस्त राज्य सरकारला जाग आणण्यासाठी या जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या पूर्वतयारीसाठी तुळजापूर शहर, तालुका आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पार्किंग व्यवस्था,  प्रथमोपचार, ध्वनी व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा व्यवस्था यासह विविध सात समित्यांचे गठन केले आहे. या जागर गोंधळाच्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली.

पुढे बोलताना, मराठा क्रांती मोर्चाच्या दुसर्‍या पर्वाचा आरंभ सकल मराठा समाजाचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीच्या दरबारातून करून आम्ही पुन्हा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी एल्गार पुकारण्यास सज्ज झालो आहोत, असे प्रतिपादन करून यानंतर गनिमी कावा पद्धतीने आंदोलने करून सरकारला जेरीस आणण्यात येईल. मूक मोर्चे नव्हे, तर ठोक मोर्चे काढून शासनाला सळो की पळो करून सोडण्यात येईल. आरपारच्या या लढ्यात यापुढील आंदोलने अधिक तीव्र केली जाणार असून त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला.

या जागर गोंधळाच्या कार्यक्रमास राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची पूर्वतयारी जवळपास पूर्ण झाली आहे.गुरुवार, 28 जून रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुनील नागणे, जीवनराजे इंगळे, अर्जुन साळुंके, किशोर पवार, नितीन पवार, अण्णासाहेब क्षीरसागर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.