Wed, Jun 26, 2019 15:16होमपेज › Marathwada › बनावट वेबसाईटद्वारे करोडोचा गंडा,भामट्याला अटक 

बनावट वेबसाईटद्वारे करोडोचा गंडा,भामट्याला अटक 

Published On: Dec 22 2018 10:51PM | Last Updated: Dec 22 2018 10:52PM
लातूर : प्रतिनिधी 

बनावट वेबसाईटच्या माध्यमातून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून राज्यातील बेरोजगारांना करोडचा गंडा घालणाऱ्या नवी मुंबई येथील एका भामट्याला लातूर पोलिसांनी जेरबंद केले असून, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जितेंद्र भोसले (वय४०) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

आरोग्य विभागाची बनावट वेबसाईट तयार करून त्यावर आरोग्य कर्मचारी मेगा भरतीची जाहिरात जितेंद्र ने दिली होती. त्यामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांनी नोकरीसाठी अर्ज करून त्याच्याशी संपर्क साधला होता. विशेष म्हणजे त्याने  एका शहरातील एका नामांकित रुग्णालयात यासाठी मुलाखतीही घेतल्या होत्या. लातुरात तो आलिशान हॉटेलात थांबत असे. आपल्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश होऊ नये म्हणून तो बाहेरगावी जाताना महाराष्ट्र शासनाचे नाव असलेल्या गाड्यांचा ताफा वापरत असे. आपले संबंध थेट मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असल्याचे सांगत बनावट नियुक्तीपत्रही तो बेरोजगारांना दाखवत असे.त्‍यामुळे हे तरुण त्याच्या जाळ्यात सहज ओढले जात असत. एका पदासाठी पाच ते दहा लाख रुपये तो घेत असे, असे लातूरचे अप्पर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक माळी यांनी पुढारीशी बोलताना सांगितले. फसवणुकीच्या गुन्ह्याखाली तो नवी मुंबई येथे अटकेत होता. तेथून सुटल्यानंतर त्याला लातूर पोलिसांनी अटक केल्याचे माळी म्हणाले. लातुरात त्याच्या विरोधात सुमारे पंधरा तक्रारी  आल्या असून, त्यावरून ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.