Sat, Jun 06, 2020 15:27होमपेज › Marathwada › व्यवस्थेच्या बेफिकीरीने् अडचणीचे डोंगर जैसे थे

पंचवीस वर्षानंतरही भय, भेगा अन भोग कायम

Published On: Sep 30 2018 10:19PM | Last Updated: Sep 30 2018 10:34PMलातूर : शहाजी पवार

प्रलयंकारी भूकंपाने आमची माणसे नेली. या आपत्तीने माथी मारलेला वनवास आज ना उद्या संपेल या आशेवर आला दिवस आम्ही काढत राहिलो. दिलेले छप्पर टिकाऊ असेल म्हणून गोड मानलं. परंतु अवघ्या दोन पावसाळ्यातच ते टपकु लागलं.  हा निवारा जिवावर उठेल?  या धास्तीने झोप उडाली अन घरासमोर पत्रे मारुन उभारलेला निवाराच आमच घरकुल झाला. तिथचं जीव मुठीत घेऊन आम्ही राहत आहोत…… किल्लारीच्या भगंवतरावावरची  ही आपबिती त्यांच्या परिवारापुरती सीमित नाही तर लातूर जिल्ह्यातील ५२ भूकंपग्रस्त गावातील अनेक घरातले हे जळजळीत वास्तव आहे. घटनेपुरते गांभीर्य घेऊन गावाचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु घरे बांधताना घ्यावयाची काळजी व पुरवायचे लक्ष याकडे सरकार व धोरणकर्त्यांनी सपशेल कानाडोळा केला.   त्यांची धोरणे त्यांना पचनी पडली असतील परंतु भूकंपाने बेघर केलेल्या माणसांच्या  मनाला  अन घराला पडलेल्या भेगा या बेफिकिरीने तशाच राखल्या आहेत. सुमारे सातशे एकरात व तीन हजार घरांत नवीन किल्लारी वसली आहे. त्यातील दोनेक हजार घरांचा अपवाद वगळला उर्वरीत घराचे बांधकाम निकृष्ट झाल्याने अवघ्या दोन वर्षांतच ती राहण्यायोग्य राहिली नाहीत. पावसाळ्यात पाणी थांबत असल्याने  अनेकांनी त्या घरावर पत्रे टाकली आहेत. पुरेशी उंची नसल्याने उन्हाळ्यात अशा घरात जीवाची काहिली होते. या भागात भूकंपाचे धक्के अधुन  मधून बसतात. तकलादू बांधकाम अन छत अंगावर पडला तर हाडामासाचा चिखल होईल , अशी भीती इथल्या माणसांच्या मनात घर करुन असल्याने  अनेकांनी  या घरांना स्टोअर रूम (भांडार गृह)  केले आहे. घरासमोर पत्र्याचे शेड मारून तिथेच त्यांनी आपली पथारी पसरली आहे. गुबाळ मधील घुमटाकार घरांना फरताळे नाहीत. उन्हाळ्यात प्रंचड उकाडा तर हिवाळ्या- पावसाळ्यात गारठा देणारी ही घरे तिथल्या नागरिकांच्या नकोशी झाली आहेत. सदस्य संख्या वाढल्यामुळे ही घरे राहण्यासाठी त्यांना अपुरी पडत आहेत.

पुनर्वसन करताना तिथल्या लोकजीवनाला पूरक अशी घरकुले उभारावी लागतात. परंतु नेमके याकडेच लक्ष पुरवले गेले नसल्याने या वास्तू गावकऱ्यांसाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा झाल्या आहेत. घरासमोर अंगण, घरामागे परस,धान्यसाठी लादण्या, जितराबांसाठी गोठे अशी जुन्या घरांची रचना होती. ती केंद्रस्थानी ठेवून पुनर्वसित घरांची उभारणी करावी, असा सल्ला जगविख्यात वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांनी शासनाला दिला होता. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. या वास्तुंमुळे  घरा पासून कोसो दूर असलेल्या शेतात जनावरे ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर गुदरली. शेतावर जागलं नसल्याने आपली जनावरे चोरी जातील अशी भीती शेतकऱ्यांना वाटते. अनेक घराच्या कबाल्याचा  प्रश्नही २५ वर्षानंतरही तसाच आहे.

निवारा असून मालकी नसल्याने शासकीय सवलतीसाठी प्रचंड अडचणी येत आहेत. वाहतूक योग्य रस्ते नसल्याने दमछाक होत आहे.भूकंपग्रस्त प्रमाणपत्रांसाठी अ़चणींचा सामना करावा लागत असून अन्याय होत असल्याची रुखरुख तरुणांच्या मनात आहे.पाण्यासाठी दाही दिशा अशी या भागाची ओळख असल्याने ती मिटावी यासाठी शासनाने या भागातील 30 खेड्यांसाठी 30 खेडी पाणीपुरवठा उभारली. गावकऱ्यांनी पाचएक वर्ष तिचे पाणी चाखले. देखभाल व दुरुस्ती अभावी  आज या योजनेला अवकळा आली आहे. साडेसात कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी असल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये लागणार असून शासनाच्या दप्तरी हा प्रस्ताव गेली अनेक वर्षे धूळ खात पडून आहे त्यामुळे पाण्यासाठी दाहीदिशा हे वास्तव अजूनही कायम राहीले आहे. या आपत्तीने वैधव्याच्या वाटेकरी झालेल्या महिलांच्या  नशिबीचा वनवास मिटला नाही.घरे मिळाली परंतु आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी  त्यांना मदत करण्यात आली नाही त्यामुळे त्यांच्यासाठी रोजचा दिवस अडचणी घेऊनच जागत आहे निराधारांना मिळणारे अनुदानही वेळेत मिळत नाही त्यामुळे अनेक विधवांनी सासर सोडून माहेर गाठले आहे.