Sun, Oct 20, 2019 12:35होमपेज › Marathwada › जात पंचायतीने टाकले कुटुंबाला वाळीत

जात पंचायतीने टाकले कुटुंबाला वाळीत

Published On: Mar 17 2019 8:27AM | Last Updated: Mar 17 2019 8:13AM
लातूर : प्रतिनिधी

नशेबाज भावामुळे आपली मानहानी होत असल्याचे कारण पुढे करीत ५० हजाराची मागणी जातपंचायतीच्या दोन सदस्यांनी केली असून गरिबीमुळे ती रक्कम न दिल्याने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात उघड झाला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव माधव बावगे यांनी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.

निलंगा येथील भिल्ल वस्तीत हा प्रकार उघडकीस आला आहे. तेथील रहिवासी गोविंद व्यंकट गांगुर्डे यांचा भाऊ सुरेश याचा विवाह लक्ष्‍मण गंगाराम विभुते यांच्या मुलीशी २००७ साली  झाला होता. त्याला पाच अपत्ये आहेत. तथापि त्याला दारूचे व्यसन जडले. तो दारू पीत असल्याने आपली बदनामी होत असून आपल्या लेकीचा काडीमोड करण्याचा निर्णय लक्ष्मण विभूते यांनी घेतला. यासाठी जातपंचायत बसवून वीस हजार रुपयांची मागणी गोविंद गांगुळे यांच्याकडे केली. विशेष म्हणजे  आपत्य वडिलांकडे राहतील, अशी  अटही त्यांनी घातली होती.  त्यानुसार गोविंद यांनी रक्कम अदा केली परंतु, तीन दिवसांपूर्वी लक्ष्मण विभूते यांनी गोविंद यांना त्यांच्या मुलीच्या अपत्य आणून दे व पन्नास हजार रुपये दे अशी मागणी केली. परंतु, एवढी रक्कम देण्यास गोविंद याने असमर्थता दर्शवल्याने जातपंचायत बसूवन गोविंद व त्यांच्या पत्नीस जात-बहिष्कृत करण्यात आले. त्यांच्या पत्नीशी अश्लील वर्तन करण्यात आल्याचे गोविंद यांनी सांगितले.

दरम्यान ही बाब जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत