Sat, Jun 06, 2020 15:56होमपेज › Marathwada › नांदेड : लाचप्रकरणात आयपीएस अधिकार्‍याला अटक

नांदेड : लाचप्रकरणात आयपीएस अधिकार्‍याला अटक

Published On: Jan 30 2018 7:41PM | Last Updated: Jan 30 2018 7:41PMनांदेड : प्रतिनिधी

अमरावती प्रकरणातील तडजोडीसाठी एक लाख रुपयांची लाच घेणार्‍या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा नांदेड इतवारा पोलिस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकार्‍यास पकडण्यात आले. ही कारवाई मंगळवारी दि. ३० रोजी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड येथे केली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी जी.विजय कृष्णन यादव हे नांदेड येथे येण्यापूर्वी ते अमरावती येथे उपविभागीय पोलिस अधिकारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची अमरावतीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती.  

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस ठाण्याअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत वाळूचा ट्रक पकडला होता. या प्रकरणी एका आरोपीस गुन्ह्याच्या प्रकरणात अटक न करण्यासाठी तसेच चार्जशीट दाखल करण्यासाठी मदत केल्याचा मोबदला म्हणून दोन लाख रुपयांची मागणी केली होती. यातील एक लाख रुपये पहिल्या टप्‍प्यातत घेण्याचे ठरले. 

ठरल्याप्रमाणे आयपीएस अधिकारी  जी. विजय कृष्णन यादव यांचे खासगी सहकारी असलेले सन्निसिंग इंदरसिंग बुगई (वय ३४ वर्षे, रा.बाबा दिपसिंग नगर, भगतसिंग रोड, नांदेड) याला लाचेच्या मागणीपैकी पहिली हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सदरची लाच ही आयपीएस अधिकारी जी. विजय कृष्णन यादव यांच्यासाठी घेतल्याची कबुली सन्निसिंग इंदरसिंग बुगई याने दिली.