Mon, Jun 01, 2020 18:12
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › चहाच्या टपरीत अवैध दारू विक्री, महिलांनी केला हल्‍लाबोल 

चहाच्या टपरीत दारू विक्री, महिलांचा हल्‍लाबोल 

Published On: May 15 2019 3:24PM | Last Updated: May 15 2019 3:25PM
हिंगोली, प्रतिनिधी  

वगरवाडी येथे चहाच्या टपरीमध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री केली जात असल्याची तक्रार हट्टा पोलिसांकडे नागरिकांनी वारंवार केली होती. मात्र पोलिस यावर कोणतीच कारवाई करत नसल्‍याच्या निषेधार्थ बुधवारी (दि.१५) वगरवाडी येथील संतप्‍त महिलांनी कायदा हातात घेत, चहा विक्रेत्यांकडील देशी दारूच्या बाटल्‍या ताब्यात घेत त्या फोडल्या. तसेच दुकानासमोरच ठिय्या आंदोलन केले.

औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथे चहाची टपरी चालविणार्‍या इसमाकडून अवैधरित्या देशी दारूची विक्री केली जात आहे. यामुळे गावात नेहमीच तणावाचे वातावरण असते. महिलांनी अनेकदा हट्टा पोलिस ठाणे अंतर्गत येणार्‍या जवळाबाजार चौकीतील पोलिस कर्मचार्‍यांना संबंधित विक्रेत्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी दुर्लक्ष केले. तसेच विक्रेत्यासही गावातील महिलांनी वारंवार दारू विकू नको, अशी विनंती केली. परंतू विक्रेत्‍याने दारूची विक्री बंद करणार नसल्‍याचे सांगितले.

यामुळे बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास महिलांनी  आक्रमक होत, थेट चहाच्या टपरीवर धाड टाकून जवळपास ३० ते ४० देशी दारूच्या बॉटला दुकानातून बाहेर आणत रस्‍त्‍यावर फोडल्‍या. तसेच दुकानासमोर ठिय्या आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळताच जवळाबाजार पोलिस चौकीच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून काही बाटल्या जप्‍त केल्या. 

या आंदोलनात निलाबाई कोळी, पारूबाई कच्छवे, कमलाबाई रावले, तुळसाबाई सोळंके, रेणूकाबाई कोळी, कलाबाई पवार, द्वारकाबाई कदम, अनुसया कदम, कलावती कदम, मिरा बोबडे, पार्वती कोळी, उषा कदम यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान दारू विक्रेत्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.