Fri, Sep 20, 2019 21:58होमपेज › Marathwada › अवैध गुटख्याच्या दामदुप्पट विक्रीतून रंक बनले राव!

अवैध गुटख्याच्या दामदुप्पट विक्रीतून रंक बनले राव!

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 1:22AMलिमला : प्रतिनिधी

गुटखा पान मसाल्यावरील बंदी झुगारून माफियांनी पोलिसांशी साटेलोटे करत अवैध गुटखा  विक्री चालू ठेवली आहे. विशेष म्हणजे गुटख्याच्या छुप्या मार्गाने होणार्‍या विक्रीची धुरा लहान मुलांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मोठी उलाढाल होत असल्याने या अवैध गुटख्याच्या व्यवसायात मोठ्या लोकांनी सहभाग घेतला आहे. थोड्या दिवसांत अवैध गुटख्याच्या विक्रीतून दामदुप्पट लाभ मिळत असल्याने झटपट श्रीमंतीचे स्वप्न पूर्ण होत आहे.  

पूर्णा तालुुक्यातील ताडकळस पोलिस प्रशासनाचे माफियांशी असलेल्या अर्थपूर्ण धोरणामुळे बंदी असलेल्या गुटख्याच्या गोरखधंद्यात लाखो  रुपयांची उलाढाल सुरू झाली. याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वास्तविक गुटख्याचा आणि पोलिसांचा सहजासहजी काही संबंध नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाने  गुटखा पकडल्यानंतर पोलिसांना सोबत घेऊन कारवाई करण्यात येते. मात्र  अन्न व औषध प्रशासन विभागाचे गावखेड्याकडे डोळेझाक असल्याने   पोलिस या काळ्या धंद्यात आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. ताडकळस पोलिस स्टेशनअंतर्गत  लिमला, लोहगाव, पिंगळी आदी  मोठ्या गावांमध्ये तालुका ठिकाणाहून रोज गुटखा पान मसाल्याची  आवक असते. लहान मुलांमार्फत या गावातून मोटारसायकलवरून  खेड्यापाड्यात गुटख्याची सर्रासपणे विक्री करण्यासाठी त्याचा पुरवठा केला जातो. यामधून रोज लाखो रुपयांची  उलाढाल होत असते. 

अन्न व औषध प्रशासन विभागाने  पोलिसांना सोबत घेऊन कारवाई  सुरू केल्यास गुटखा माफियांचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागानेही तातडीने कामाला लागण्याची गरज आहे.