Sun, Jun 07, 2020 14:00होमपेज › Marathwada › घरकुल गैरव्यवहारात बडे मासे गळाला?

घरकुल गैरव्यवहारात बडे मासे गळाला?

Published On: May 04 2019 1:43AM | Last Updated: May 03 2019 10:17PM
नळदुर्ग ः प्रतिनिधी

येथील बहुचर्चित, कथित घरकुल गैरव्यवहारप्रकरणी इन कॅमेरा चौकशीदरम्यान अनेक धक्‍कादायक बाबी उघडकीस येत आहेत. चौकशीच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी तांत्रिक तपासणी पथकातील अधिकारी तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे उपजिल्हा अधिकारी संतोष राऊत यांनी वसंतनगर येथे घरकुल बांधकामांची मोजमाप व तपासणी केली. या कथित गैरव्यवहारात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास निर्मूलन योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुल व इतर कामांबाबत प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी कामाचे संबंधित कंत्राटदार, तत्कालीन पदाधिकारी, तत्कालीन मुख्याधिकारी, तत्कालीन अभियंता, तत्कालीन सल्लागार एजन्सी यांच्या समक्ष चाचण्या घेऊन व संयुक्‍त मोजणी करुन घरनिहाय कामाचे मूल्यांकन केले जात आहे.

पथकाची तपासणी मोहीम गुरुवार, 2 मे रोजीपासून सुरू असून या पथकात ‘म्हाडा’चे 7, नगरपालिकेचे 5 कर्मचारी व अधिकार्‍यांसह 25 सदस्यांचा सहभाग आहे. गुरुवारी  वसंतनगर, जलशुद्धीकरण केंद्र, इंदिरानगर, शिवकरवाडी आदी ठिकाणी घरकुल योजनेंतर्गत बाह्य सोयीसुविधांकरिता बांधण्यात आलेल्या रस्ते, गटार, पाईपलाईन, लाईटची व्यवस्था याबाबत खोदकाम करुन  तपासणी करण्यात आली.
तपासणी मोहिमेदरम्यान शुक्रवारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उदय जगदाळे, नगरसेवक नय्यर जहागीरदार, मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी तुकाराम कदम आदी उपस्थित होते. 

घरकुल बांधकाम व बाह्य सुविधेसाठी करण्यात आलेल्या कामांचे मोजमाप घेऊन तपासणी केली जात आहे. अंदाजपत्रक आणि मोजमाप यांची सत्यता पडताळून त्याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्‍तांना देणार आहे.
- व्ही. पी. केदारे
तपासणी समितीचे प्रमुख