होमपेज › Marathwada › आखाडा बाळापुरात दहा हजाराची लाच घेताना केंद्रप्रमुखाला अटक 

आखाडा बाळापुरात दहा हजाराची लाच घेताना केंद्रप्रमुखाला अटक 

Published On: Nov 30 2018 5:18PM | Last Updated: Nov 30 2018 5:18PMआखाडा बाळापूर : प्रतिनिधी

प्रपत्र ड मधील मंजूर घरकुलाचे नाव अ किंवा ब यादीत बदलून देण्यासाठी दहा हजाराची लाच घेणार्‍या कळमनुरी पंचायत समिती शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख बालाजी गोरे यास एसीबीच्या पथकाने आज शुक्रवारी (दि.30) दुपारी साडेबाराच्या सुमारास अटक केली. ही कारवाई नादेड-हिंगोली रस्त्यावरील आखाडा बाळापूर येथील तुळजाई हॉटेलसमोर केली. यावेळी गोरे यास लाचेच्या रक्‍कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले.

कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील तक्रारदाराने त्याच्या नावे तसेच वडील व भावाच्या नावाने मंजुर झालेल्या प्रपत्र ड यादीतील घरकुल मंजूर झाले होते. त्या यादीची पडताळणी करण्याची जबाबदारी कळमनुरी पंचायत समिती शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. प्रपत्र ड मधील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने आपले नाव अ किंवा ब यादीत घ्यावे अशी विनंती गोरे यांच्याकडे केली असता, गोरे यांनी प्रत्येकी पाच हजाराची मागणी केल्याची तक्रार दि.29 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तडजोडीअंती दहा हजार देण्याचे ठरले. या तक्रारीची पडताळणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक रविंद्र थोरात यांनी केली असता, त्यात तत्थ आढळले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचून दुपारी साडेबाराच्या सुमारास आखाडा बाळापूर येथील तुळजाई हॉटेलसमोर केंद्र प्रमुख बालाजी गोरे यास तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर गोरे यांना कळमनुरी पंचायत समिती कार्यालयात पुढील तपासासाठी रवाना करण्यात आले. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपाधिक्षक रविंद्र थोरात, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील, जमादार उमर शेख, सुभाष आढाव, अभिमन्यू कांदे, विजय उपरे, प्रमोद थोरात, अविनाश किर्तनकार, गजानन आगलावे, रूद्रा कबाडे, संतोष दुमाने, शेख जमीर यांच्या पथकाने केली.