Mon, Jun 01, 2020 18:39
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › बाळापूर पोलिसांचा डिजीटल जुगार अड्डयावर छापा

बाळापूर पोलिसांचा डिजीटल जुगार अड्डयावर छापा

Published On: Nov 21 2018 5:43PM | Last Updated: Nov 21 2018 5:43PMआखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : प्रतिनिधी

कळमनुरी तालुक्यातील चुंचा शिवारात दुपारी दीडच्या सुमारास हदगावकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली मोबाईलवर पैसे लावून लुडो गेम खेळणार्‍या अड्डयावर आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये सात जुगार्‍यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील सहा मोबाईल आणि रोख 28 हजार 60 रूपये असा एकूण 58 हजार 60 रूपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. लुडो जुगारावर छापा टाकण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर हे बुधवारी (दि.21) दुपारी एकच्या सुमारास ई-ए-मिलादुन्नबीचा बंदोबस्त आटोपून डोंगरकडा, वारंगा भागात पेट्रोलिंग करीत असताना चिंचोलकर यांना गुप्‍त बातमीदारामार्फत चुंचा येथे शेख शब्बीर यांच्या हॉटेलच्या बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाखाली मोबाईलवर पैसे लावून लुडो गेम खेळत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, वंजारे, शेख जावेद, गुरूपवार, भोयर आदींच्या पथकाने दुपारी दीडच्या सुमारास लुडो खेळणार्‍या अड्डयावर छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याजवळील सहा मोबाईल (किंमत 30 हजार रूपये ) आणि नगदी 28 हजार 60 रूपये असा एकूण 58 हजार 60 रूपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. तसेच आरोपी संजय परसराम मोहिते, सुनिल दत्तराव कनके, गणपत सिताराम पवार, परसराम हरसिंग जाधव, पांडूरंग संभाजी चंद्रवंशी, सय्यद आरेफ सय्यद करामत अली, रामराव शेषराव शेळके (सर्व रा.चुंचा) यांना ताब्यात घेतले. या सातही आरोपीविरोधात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.
मागील काही महिन्यांपासून आखाडा बाळापूर पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या अनेक गावांमध्ये मोबाईलवर पैसे लावून लुडो गेम खेळत असल्याचा प्रकार वाढला आहे. या संपूर्ण प्रकारावर सहायक पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांचे विशेष लक्ष होते. बुधवारी खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीवरून लुडो गेम खेळणार्‍या सात जणांच्या मुसक्या आवळण्यात बाळापूर पोलिसांना यश आले.