Thu, Jun 04, 2020 14:26होमपेज › Marathwada › हाताळा गावही काढले विकायला

हाताळा गावही काढले विकायला

Published On: Jul 25 2019 1:50AM | Last Updated: Jul 24 2019 10:43PM
सेनगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील ताकतोडा येथील ग्रामस्थांनी पीकविमा व सरसकट कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण परिसरातील गावांत देखील पसरू लागले आहे.  या गावापाठोपाठ आता हाताळा ग्रामस्थांनी गाव विक्रीला काढले आहे.   दुसरीकडे आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ सहाव्या दिवशी ताकतोडा येथील उपोषणकर्त्यांनी मुंडण केले.  

ताकतोडा येथील ग्रामस्थांनी पीकविमा व सरसकट कर्ज माफीसह विविध मागण्यांसाठी शेत जमिनीसह गावच विक्रीला काढले आहे.  या गावापाठोपाठ हाताळा येथील ग्रामस्थांनीही आंदोलनात उडी घेतली आहे. ग्रामस्थांनी मुख्यमंत्री यांना हाताळा गाव विकत घ्या अशी मागणी केली. तहसीलदार जिवककुमार कांबळे यांना  बुधवारी (दि. 24) या संदर्भातील निवेदन दिले आहे. तर दुसरीकडे ताकतोडा ग्रामस्थांचे आंदोलन सुरूच आहे. 15 ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले.  गावातील शाळेत शुक्रवारपासून पाल्यांना पाठविणे पालकांनी बंद केले आहे.   त्यासोबतच ग्रामपंचायत कार्यालयात जाणे बंद  केले.   आंदोलनादरम्यान तहसीलदार जिवककुमार कांबळे यांनी गावाला भेट दिली. यावर तोडगा न निघाल्याने उपविभागीय  अधिकारी अतुल चोरमारे यांनी गावकर्‍यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र   मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा गावकर्‍यांनी घेतला आहे. शासन  दखल घेत नसल्याच्या  निषेधार्थ आंदोलकर्त्यांनी बुधवारी मुंडण करीत निषेध व्यक्त केला. याची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी ताकतोडा येथे तळ ठोकून होते.