Sun, Jun 07, 2020 08:19होमपेज › Marathwada › गेवराईत गोदामाला आग

गेवराईत गोदामाला आग

Published On: Mar 12 2019 1:49AM | Last Updated: Mar 12 2019 1:33AM
गेवराई : प्रतिनिधी 

शहरातील मोंढा भागात राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागून  तूर व कापूस जळून खाक झाला. गेवराई, बीड, जालना आणि औरंगाबाद अग्निशमनदलाच्या गाड्यांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आगीत सोळा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेवराई येथील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोंढा भागात  राज्य वखार महामंडळाचे चार गोदाम आहेत. यातील चार नंबरच्या गोदामाला रविवारी मध्यरात्री आग लागली. ही बाब लक्षात येताच वॉचमन दत्ता चव्हाण यांनी तत्काळ गेवराई पोलिसांना तसेच अग्निशमनदलाला ही माहिती दिली. यानंतर तत्काळ पोलिस तसेच नगर परिषदेचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अग्निशमन दल घटनास्थळी हजर झाले होते. मात्र, आगीने उग्र रूप धारण केल्याने बीड येथील तीन, औरंगाबाद येथील एक, जालना येथील एक अशा सात गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात येत नव्हती. तर खासगी पाच टँकरने येथील नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा केला अशा 12 वाहनांच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गोडाऊनचे शटर उचकटून, गोदामाच्या भिंती जेसीबीच्या माध्यमातून तोडून देखील आग आटोक्यात आली नव्हती.

या गोदामामध्ये आयसीआयच्या कापसाच्या 1 हजार 208 गाठी (किंमत 2 कोटी 5 लाख रुपये) ठेवण्यात आल्या होत्या. खासगी ठेवीदारांच्या वखार पावतीवर कापसाच्या 5 हजार 100 गाठी (किंमत 10 कोटी), तर एक खासगी शेतकर्‍याची 1 लाख 89 हजार रुपयांची तूर होती. तसेच नाफेडची 3 हजार 400 पोती तूर (किंमत 1 कोटी) ठेवण्यात आली होती. हे सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असून गोदामदेखील (1 कोटी 50 लाख) आगीत भस्मसात झाले आहे. या आगीत 15 कोटी 46 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र भुसे यांनी सांगितले.