Thu, Oct 17, 2019 14:22होमपेज › Marathwada › हिंगोलीत युती आघाडीत काट्याची लढत

हिंगोलीत युती आघाडीत काट्याची लढत

Published On: Apr 16 2019 2:34AM | Last Updated: Apr 16 2019 2:20AM
गजानन लोंढे

हिंगोली लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसच्या प्रचारात मरगळ आली असताना खा. राजीव सातव यांनी दोन दिवसांत घेतलेल्या प्रचार सभेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्यामुळे युती व आघाडीतील सामना रंगतदार ठरणार आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीच्या सभेला मिळणारा प्रतिसाद पाहता, ही निवडणूक ऐनवेळी चांगलीच चुरशीची होणार आहे.

प्रचाराचा अंतिम टप्पा आता सुरू झाला आहे. हातात केवळ दोन दिवसच शिल्‍लक राहिल्यामुळे उमेदवारासह त्यांचे नातेवाईकही प्रचारात पायाला भिंगरी बांधून फिरू लागले आहेत. महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तर महाआघाडीकडून धनंजय मुंडे, खा. राजीव सातव यांच्या सभा झाल्या. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनीही सभा घेतल्यामुळे आता खर्‍या अर्थाने निवडणुकीच्या प्रचारात रंगत आल्याचे चित्र आहे. 

यंदाच्या निवडणुकीत तब्बल 28 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये अपक्षाची संख्या मोठी आहे. अपक्ष उमेदवारांची प्रचार यंत्रणा म्हणावी तशी सक्रिय दिसून येत नाही. बसपचे डॉ. दत्ता धनवे हे अधून मधून प्रचारात दिसून येत आहेत. खरी लढत ही शिवसेनेचे हेमंत पाटील व काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यामध्ये होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी व युतीतील पदाधिकार्‍यांची मनधरणी करण्यातच उमेदवारांना शक्‍ती खर्च करावी लागली. 

आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेेडे यांना काँग्रेसमधील गटबाजी बाजूला सारत एकसंध प्र्रचारासाठी जोर लावावा लागला. दुसरीकडे आ. हेमंत पाटील यांना शिवसेनेतील नाराजांना सोबत घेत भाजपाच्या पदाधिकार्‍यांचीही मनधरणी करावी लागली. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना स्वकीयांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. सध्या दुसरा टप्पा जोमात सुरू असून दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते अंतर्गत वाद बाजूला ठेवून कामाला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अपक्ष उमेदवार प्रा. संदेश चव्हाण यांनीही प्रचारात जोर लावल्याचे दिसून येत असल्याने या दोन उमेदवारांच्या मतांचा नेमका फटका कुणाला बसतो, यावर उमेदवाराच्या निवडीची गणिते अवलंबून आहेत.