Sat, Oct 19, 2019 09:37होमपेज › Marathwada › नांदेड : पती पत्‍नीसह चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्‍यू 

नांदेड : पती पत्‍नीसह चिमुकलीचा बुडून मृत्‍यू 

Published On: Aug 21 2018 9:42AM | Last Updated: Aug 21 2018 9:49AMनायगाव बाजार (जि. नांदेड) : प्रतिनिधी

नायगावपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मांजरमजवळ नदीला आलेल्या पाण्यात तवेरा गाडी वाहून गेल्याने बरबडा येथील पती, पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या एका घटनेत मांजरम येथील तरुणाला मोटारसायकलसह जलसमाधी मिळाल्याने मांजरम व बरबडा गावावर शोककळा पसरली आहे. 

नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गंगाधर मारुती दिवटे हा बहिणीच्या घरी मांजरम येथे मावंद्याचा कार्यक्रम असल्याने मित्राची तवेरा गाडी घेवून पत्नी पारुबाई व आपल्या आठ वर्षाच्या मुलीला घेवून आला होता. मावंद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर परत जायला निघाला यावेळी पाऊस पडत आहे सकाळी लवकर जा असे काहींनी सुचवले पण गाडी मित्राची असल्याने जावे लागणार म्हणून निघाला. मांजरमजवळच असलेल्या नांदेड रोडवरील नदीला पूर आला होता. गंगाधर यांने पुराच्या पाण्याचा पुरेसा अंदाज न घेता तवेरा पाण्यात घातली. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तवेरा गाडी वाहून गेली.  ही घटना मांजरम येथील गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी धाव घेत  रात्री १ वाजताच्या सुमारास तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.  

दुसऱ्या घटनेत मांजरम येथीलच एक तरुण रुग्णालयात बाळंत झालेल्या आपल्या बहिणीला जेवनाचा डब्बा देवून नायगाव येथून मांजरमकडे बेंद्री मार्गे येत असताना एका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला. विनायक बालाजी गायकवाड असे या तरूणाचे नाव आहे. रात्री उशिरा बेंद्री शिवारात विनायक गायकवाड याचा मृतदेह सापडला.