Thu, Jun 04, 2020 13:10होमपेज › Marathwada › निवडणुकीत सोशल मीडियाने घेतली प्रचारात आघाडी

सोशल मीडियाने घेतली प्रचारात आघाडी

Published On: Apr 09 2019 10:35AM | Last Updated: Apr 09 2019 10:35AM
बोरी : मारोती गायकवाड 

परभणी जिल्ह्यामधील लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांपर्यंत विशेषतः युवा पीढीतील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामुख्याने सत्ताधारी भाजप- शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार पद्धतीने आगळा-वेगळा प्रचार केला जात आहे. हा प्रचार करत असताना फेसबूक, व्हाट्सअॅप, व्हाट्सॲप स्टेटस व कंपनी कडून प्रत्यक्ष मोबाईल फोन या माध्यमातून प्रचार केला जात आहे.

हा प्रचार करत असताना सोशल मीडियावर प्रचारासाठी राजकीय पक्षाचे शेकडो कार्यकर्ते हे काम करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मी मतदार - माझा उमेदवार, लोकचळवळ परिवर्तनाची, स्वच्छ भारतासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, मै भी चौकीदार, फिर एक बार मोदी सरकार, सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक, परिवर्तन होणारच त्याचबरोबर ठिकाणी झालेल्या जाहीर सभेच्या छोट्या-छोट्या व्हिडिओ क्लिप मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेकडो कार्यकर्ते व्हाट्सॲप, फेसबूक, व्हाट्सअॅप स्टेटस यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रचार युद्ध चालू आहे.

तसेच वेब सिरीज पासून तर संगीताच्या माध्यमातून निवडणूक प्रचार करून सोशल मीडियाद्वारे लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप - शिवसेना च्या वतीने " मै भी चौकीदार" ची  मोहीम राबवली जात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने " मी मतदार - माझा उमेदवार " ही खूप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर मोहीम राबवली जात आहे. तसेच जिल्ह्‍यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जाहीर सभा होत आहेत, त्या सभेमध्ये एकमेकांवर केलेली आरोप-प्रत्यारोप यांच्या छोट्या छोट्या क्लिप सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशिक्षित कार्यकर्ते मोठ्या संख्येने वायरल करत आहेत. यामुळे सोशल मीडियावर एक प्रकारचे जणू प्रचार युद्धच चालू आहे असे म्हणावे लागेल.