Sun, May 31, 2020 02:28होमपेज › Marathwada › दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना ‘लाल परीचा’ आधार

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना ‘लाल परीचा’ आधार

Published On: Nov 30 2018 1:26AM | Last Updated: Nov 29 2018 10:49PMपाटोदा : प्रतिनिधी

यंदा तालुक्यावर वरुणराजाची अवकृपा झाल्याने  भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या शेतीचीच पूर्णतः वाताहत झाल्याने या परिसरातील जनतेचे अर्थकारणच बिघडले आहे. विद्यार्थ्यांसाठी मात्र एस.टी.बस आधार बनत असून  या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पाटोद्यात येणार्‍या विद्यार्थ्यांना पाच महिन्यांसाठी मोफत पासची सुविधा देण्यात येत  आहे .

पाटोदा तालुका हा मागील काही वर्षांपासून  नैसर्गीक आपत्तींना तोंड देत आहे. कधी भिषण दुष्काळ व पाणीटंचाई तर कधी अतिवृष्टी यामुळे तालुक्यातील शेतीची अक्षरशः वाताहत झाली आहे. या परिसरातील तब्बल 70 टक्के लोक ऊसतोड कामगार म्हणुन वेगवेगळ्या कारखान्यांची वाट धरतात. या ऊसतोड कामगार व शेतकर्‍यांच्या मुलांना चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर म्हणजेच 5 वीच्या नंतर किंवा 7 वीच्या नंतर पुढील शिक्षणासाठी पाटोद्याला यावे लागते. हे विद्यार्थी दररोज ये-जा करण्यासाठी एस.टी. बसचा वापर करतात. आत्तापर्यंत या विद्यार्थ्यांकडून  मासिक शुल्क सवलतीच्या दरात आकारले जात असे मात्र यंदा दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एस. टी. ने 15 नोव्हेंबर ते 15 एप्रिल असे पाच महीने मोफत पास योजना सुरु केली आहे. 

यामध्ये नियमित पासधारक विद्यार्थ्यांना पुर्णतः मोफत पास देण्यात येत आहेत.त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर योजनेतुन आता 11 वी 12 वी तील मुलींसाठीही ही योजना लागु होणार आहे. यामुळे शिक्षण घेण्यासाठी शहरात येणार्‍या दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.