Mon, Jun 01, 2020 18:03
    ब्रेकिंग    



होमपेज › Marathwada › डॉ.अशोकराव कुकडे निरपेक्ष सेवायोगी

डॉ.अशोकराव कुकडे निरपेक्ष सेवायोगी

Published On: Jan 25 2019 11:29PM | Last Updated: Jan 25 2019 11:29PM




लातूर : शहाजी पवार 

वैद्यकीय सेवेतील योगदानाबद्दल लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोकराव कुकडे यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या सन्मानाने लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या पुरस्काराबद्दल डॉक्टरांना कळविण्यात आले.

डॉ. अशोकराव लक्ष्मणराव कुकडे हे मूळ पुण्यातले. त्यांचे वडील पुण्यातील ख्यातनाम डॉक्टर होते. उच्च शिक्षण, पदवी, व्यवसायासाठी पुण्यात अनुकूलता असतानाही आत्यंतिक मागासलेल्या मराठवाड्यातील लातूरला डॉ. कुकडे यांनी जाणीवपूर्वक आपली कर्मभूमी म्हणून निवडले. त्यांचा हा निर्णय त्यावेळी अनेकांना वेडेपणाचा वाटला. अवघ्या सहा महिन्यात तू परत येशील त्यामुळे जाऊच नको अशी गळही अनेकांनी घातली.  परंतु मिरजेचा रुग्णालयात अनुभवलेली  मिशनरी डॉक्टरांची सेवावृत्ती त्यांना या कार्याप्रत आणणारी ठरली. प्रारंभी  हे रुग्णालय एका छोट्या  बंगल्यात होते. रुग्णाने डॉक्टरपर्यंत येण्याऐवजी डॉक्टरांनी रुग्णापर्यंत पोहोचावे सेवाभाव जगलेल्या डॉक्टरांनी वेळप्रसंगी सायकलीवर जाऊन रुग्णांना  सेवा दिली. त्याचा हा सेवाभाव समाजाला भावला,  या स्नेहाने ते सर्वांचे काका झाले तर या कार्यात सावलीसारखी साथ देणाऱ्या त्यांच्या पत्‍नी भाग्यवती डॉ. ज्योत्स्ना  या सर्वांच्या काकू झाल्या.

डॉ. कुकडे हे पुण्याचे आहेत असे सांगितल्यास अनेकांचा त्यावर विश्वास बसत नाही  इतके  ते लातूरकरांशी व  लातूरकर त्यांच्याशी  एकरूप झाले आहेत. माझी सत्तावीस वर्ष  पुण्यात तर त्यापेक्षा अधिक वर्ष लातुरातील सेवाकार्यात गेली आहेत व पुढेही ती जातच आहेत, त्यामुळे लातूरकरांना मी थोडाच पुणेकर वाटेल? असे कुकडे काका सांगतात  तेव्हा तेव्हा त्यांचे लातूरकरांशी असलेले नाते  किती दृढ आहे याचा पुरावाच मिळतो.  त्यांच्या सेवा कार्याला  केवळ वैद्यकीय सेवेची सीमा नसून शेती, पर्यावरण, जलसंधारण  व अन्य समाजसेवेतही  त्यांचे मोठे योगदान आहे. भूकंपग्रस्त भागात विवेकानंद प्रतिष्ठानने दिलेली सेवा निरपेक्ष सेवेचा वस्तुपाठ ठरली आहे. त्यांच्या पुढाकारातून लातूर नजिक   झालेल्या मांजरा नदीत लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामाने  वेगळी ओळख दिली आहे.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरू असलेल्या विवेकानंद रुग्णालयाच्या कार्याची दखल शासनाने घेतली असून रुग्णालयाच्या कॅन्सर हॉस्पिटलला केंद्र शासनाने टर्सरी कॅन्सर केअर सेंटर मंजूर केले आहे.  लिनियर एक्सीलेटर मशिन उपलब्ध झाले आहे.  यामुळे गरिबांना कर्करोगावर उपचार घेता येत आहेत. रुग्ण सेवेतील नफेखोरी ही आज चिंतेचा विषय झाली आहे. परंतु, अशा काळातही विश्वस्त  वृत्तीची निरपेक्ष सेवाशाही काकांच्या  पुढाकारातून  सुरू आहे.  वडिलांनी रुजवलेली सेवावृत्ती, आप्पासाहेबांचा लोकसेवेचा विचार, स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाकडे पाहण्याची शिकवण या संस्कारामुळे विवेकानंद रुग्णालयाला आकार देणे सोपे झाले. अडचणी आल्या, अडथळे आले, मनुष्य स्वभावाचे अनेक पैलू समोर आले परंतु, संस्कारामुळे मन सैरभैर झाले नाही व स्वतः पुरता जगण्याचा विचारही मनात प्रबळ झाला नाही. पद्मभूषण  मिळेल असे वाटले नव्हते. तसा आपण कधी विचारही केला नव्हता.  आजवर केलेल्या व करीत असलेल्या सेवेला या पुरस्काराने शासन मान्यता मिळाली, अशी भावना डॉ. कुकडे यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केली. आपल्या ज्ञान बुद्धीचा वापर करून श्रीमंत होणं तसं कोणालाही कठीण नाही परंतु स्वतःपुरता विचार न करता निरपेक्ष भावनेने सर्वसामान्यांचा विचार करून एखादी व्यक्ती कार्यरत होते तेव्हा तिच्या हातून  मोठं काम होतं. कुकडे काकांचा कर्मयोग याचीच साक्ष देत आहे.