Sun, Jun 07, 2020 15:44होमपेज › Marathwada › धुळ्‍यात तब्‍बल ५३ लाखांचा अवैध मद्य साठा जप्त

धुळ्‍यात तब्‍बल ५३ लाखांचा अवैध मद्य साठा जप्त

Published On: Jul 20 2018 5:06PM | Last Updated: Jul 20 2018 5:06PMधुळे : प्रतिनिधी

मध्य प्रदेशातून गुजराथ राज्यातील बडोदा येथे जाणारा 53 लाखाचा अवैध मद्याचा साठा धुळ्यातील मोहाडी उपनगर पोलीस पथकाने पकडला आहे. या प्रकरणात चालक आणि क्लिनर विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मद्याचा काळाबाजार करणाऱ्या सुत्रधारा पर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास पोलीस अधीक्षक रामकुमार आणि अपर अधीक्षक विवेक पानसरे यांनी व्यक्त केला आहे. 

धुळे शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरून मोठा मद्य साठा जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आणि निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली .त्यानुसार त्यांनी महामार्गावर नाशिक आणि गुजराथ राज्यात जाणाऱ्या रस्त्यावर गस्त वाढवली. यावेळी पथकाने एम एच18 एफ 0221 आणि एम एच 18 एफ 0172 या जीपमधून गस्त करीत असताना त्यांना चाळीसगाव चौफुलीकडून एमपी 09 एच पी 6916 नंबरचा ट्रक हॉटेल रेसिडेन्सी समोर आला. या ट्रकला थांबवून पोलिसांनी चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र चालकाने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे डीवायएसपी सचिन हिरे आणि निरीक्षक अभिषेक पाटील यांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यात मद्याचा साठा दिसला. त्यामुळे हा साठा जप्त करण्यात आला. मोहाडी पोलिस ठाण्यात चालक मध्य प्रदेशात राहणारा चालक इम्रानखान बाबुखान व क्लिनर राजू रणबहादूर या दोन जणांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत चालकाने मध्य प्रदेशातील मंडसौरमधून पंडित नामक व्यक्तीने मद्य साठा भरला होता. हा साठा बडोदा येथे जाणार होता. येथे हा साठा कुणाला द्यावयाचा आहे. याची माहिती नसल्याचे चालकाने सांगितले आहे. पोलिसांनी ट्रकमधून  2 लाख 6 हजाराची बियरचे 95 बॉक्स, 7 लाख 93 हजाराचे एम एल व्हिस्कीचे 98 बॉक्स, 20 लाख 20 हजाराचे क्लासिक व्हिस्कीचे 102 बॉक्स,2 लाख 88 हजाराचे ऑफिसर चॉईस व्हिस्कीचे 30 बॉक्स,3 लाख 36 हजाराचे मॅकडोनेल व्हिस्कीचे 28 बॉक्स, 3 लाख 12 हजार रुपये किमतीचे इंपेरिएल ब्लू व्हिस्कीचे 26 बॉक्स,4 लाख 80 हजार किमतीचे मॅजिक मोमेंट व्होडकाचे 40 बॉक्स, 3 लाख 60 हजाराचे ऑफिसर चॉईस ब्लू व्हिस्कीचे 30 बॉक्स , 5 लाख 5 हजार रुपये किमतीचे रॉयल चॅलेंज व्हिस्कीचे 30 बॉक्स तसेच ट्रक सह 73 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात ट्रकचा चालक आणि क्लिनर विरोधात भा द वि कलम 328,482,486,487,420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.