Wed, Jun 03, 2020 07:26होमपेज › Marathwada › बहिण-भावाच्या नात्‍यात विष कालवण्याचा प्रयत्‍न, धनंजय मुंडे भावूक

बहिण-भावाच्या नात्‍यात विष कालवण्याचा प्रयत्‍न, धनंजय मुंडे भावूक

Last Updated: Oct 20 2019 1:47PM
परळी वैजनाथ : प्रतिनिधी

मला पुन्हा एकदा खलनायक करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी सगळी नाती मनापासून जपली आहेत. हे सर्वज्ञात आहे.  राजकारणात काय व्हायचं असेल ते होउ द्या आमच्या रक्ताच्या नात्यात ज्यांनी कोणी विष कालवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या शब्दाचा अनर्थ कोणी काढला आहे  यामागे मी खोलवर जाईन. पण हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. पुन्हा एकदा मला खलनायक ठरवले जात असल्याचे भावूक होउन धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

धनंजय मुंडे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावरून राजकारण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत खुलासा केला. यावेळी त्यांनी सांगितले की, मी पंकजा आणि प्रीतम कडून राखी बांधून घेतलीय. आमच्या परिवारात गेल्या पिढीत असच काही लोकांनी दोन भावांमध्ये विष कालावलं. त्याच फळ मी आजही भोगतोय. 

आता पुन्हा एकदा ताईंच्या आवती भोवती नव्याने आलेल्या काही जणांनी आमच्या रक्ताच्या नात्यात विष कालवले आहे. धनंजय मुंडे संपला पाहीजे यासाठीच हे चाललंय असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. मी जे भाषणात बोललो त्या व्हिडिओला एडीटींग केलं गेलं आहे. माझी खरी व्हिडिओ क्लीप आणि व्हायरल होणारी क्लीप फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवा. मी नाती जपणारा माणूस आहे असेही ते म्हणाले. कोणाच्या मनाला लागेल असं कधी बोललं नाही. विरोधकांनी लोकांच्या मनांत स्थान निर्माण करून निवडणूक जिंकावी. राजकारण जाउद्या पण आमच्या नात्याला बदनाम केले. त्यामुळे मला असं वाटलं की जग सोडावं असे म्हणत धनंजय मुंडे भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पोलिसांनी माझ्या भाषणाची सीडी तपासली नाही. तरी माझ्यावर गुन्हा दाखल केला. काहींना वाटतंय की मी पृथ्वीतलावर नसलो पाहीजे. मी विरोधी पक्षनेता असताना राजधर्म पाळला. पण आता जे केलं जातंय ते कशासाठी ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित  केला.