Mon, Jun 01, 2020 18:37
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › एमआयएममुळे दलित नगरसेवक नाराज

एमआयएममुळे दलित नगरसेवक नाराज

Published On: Apr 16 2019 2:34AM | Last Updated: Apr 16 2019 2:27AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्रित लोकसभा निवडणूक लढत आहे. एमआयएमने केवळ औरंगाबादेतून उमेदवार दिला आहे. मात्र ज्या मुस्लिम आणि दलित समाजाच्या जोरावर ते विजयाचे गणित जुळवू पाहात आहे. तो समाजच मतदान आठवडाभरावर असतानाच एमआयएमपासून दुरावत असल्याने उमेदवारासह प्रमुख पदाधिकारी अस्वस्थ झाल्याचे चित्र दिसत आहे. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी तिसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारांकडे प्रचारासाठी आता केवळ पाच दिवसच शिल्लक राहिले आहेत. एकीकडे  शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येकजण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे एमआयएममध्ये अंतर्गत वादंगाचे चित्र दिसून येत आहे. मुस्लिमबहुल भागातून होत असलेला विरोध पाहून पक्षातील काही नगरसेवकांनी आपल्या उमेदवाराच्या निवडणूक लढविण्यावरच प्रश्‍न उपस्थित करणे सुरू केले आहे. वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणीनंतर एमआयएम लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे पक्षाध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांनी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडे स्पष्ट केले होते, परंतु असे असतानाही एमआयएमच्या एक-दोन स्थानिक पदाधिकार्‍यांतून निवडणुकीबाबत चर्चा घडवून आणली गेली. या मागचे नेमके कारण काय आहे, असा सवाल हे नगरसेवक उपस्थित करू लागले आहेत. 

आता एमआयएममधील हा वादंग दलित-मुस्लिमबहुल भागातील नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे ज्या मतांवर एमआयएमने दंड थोपाटले होते, ते आवाहन आता डोईजड जाण्याचे चित्र दिसून येत आहे. एमआयएमच्या काही पदाधिकार्‍यांनी अपक्ष दलित नगरसेवकांच्या वॉर्डात त्यांना डावलून बैठका घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. आपल्या वॉॅर्डातील बैठकीतून वगळण्यात येत असल्याने हे अपक्ष दलित नगरसेवक चांगलेच संतापले आहेत. उमेदवाराबद्दल ते कमालीची नाराजी व्यक्‍त करीत आहेत. आम्ही काम करण्यास तयार असतानादेखील वॉर्डातील बैठकांना बोलवण्यात आले नाही. त्यामुळे एमआयएमला ‘एकला चलो रे’ धोरणाचा निश्‍चित फटका बसेल, असा इशारा देत नाराज नगरसेवकांनी इतर उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात जाण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. 
मतदानापर्यंत काहीही होऊ शकते

आपण काँग्रेसच्या वाटेवर आहात अशी चर्चा आहे, अशी विचारणा एमआयएमचे माजी विरोधी पक्ष नेता जहांगीर खान यांना विचारला असता ते म्हणाले की, एमआयएममध्ये येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये होतो. त्यामुळे अनेक जण आपले मित्र आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या वॉर्डात बैठक घेतली होती. त्यांना भेटण्यासाठी आपण त्या बैठकीच्या ठिकाणी गेलो होतो. आपण सध्या एमआयएममध्ये असलो तरी या लोकसभा निवडणुकीच्या मतदानापर्यंत काहीही घडू शकते, असे संकेतही त्यांनी दिले.