Sat, Jun 06, 2020 21:56होमपेज › Marathwada › हवेतील शितलहरी अन् धुक्यात हरवलेल्या वाटा

हवेतील शितलहरी अन् धुक्यात हरवलेल्या वाटा

Published On: Dec 20 2018 1:24AM | Last Updated: Dec 20 2018 1:24AM
लिमला : शिवबाबा शिंदे 

थंडगार वार्‍याच्या शीतलहरी, ढगाळ आकाश अन् धुक्यात हरवलेल्या वाटा अगदी महाबळेश्‍वरासाखी स्थिती आज पहाटे निर्माण झाली होती.  धुक्याच्या चादरीतून जवळपास काय घडत आहे हे कळणे कठीण  झाले होते.  सकाळी  पावणे नऊपर्यंत गाव, शिवार धुक्यात हरवून गेला होता. 

दरम्यान  वाढत्या थंडीने परिसरातील रस्ते सायंकाळनंतर  निर्मनुष्य होत आहेत. सामान्य माणसं  आपली बाजारहाटची कामे झटपट आटोपून अंधार पडण्याआधीच सातच्या आत घरात बसणे पसंत करत आहेत. थंडीमय वातावरण निर्माण झाल्याने  चहाची क्रेझ वाढली आहे. चहाच्या टपर्‍या-पानठेले गर्दीने फुलून गेले आहेत. या  गारठ्याचा व्यापारावरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. शेतात काम करणारे शेतमजूर दिवसभराची शेती कामे आटोपून  सायंकाळी घराभोवती  शेकोट्या पेटवून गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.  जीवघेण्या  लोडशेडिंगमुळे रात्री शेतात जागली करणार्‍या शेतकर्‍यांचे  हाल होत आहेत. सध्या  शेतात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भिजवण चालू आहे. वझूर येथील 33 केव्ही उपकेंदांतर्गत  लिमला भागात रात्री बारा वाजता  थ्रीफेज वीज येते. त्यामुळे रात्र पाळी भिजवणासाठी शेतात जागली  करणार्‍या शेतकर्‍यांचे थंडीमुळे  हाल होत आहेत. गावे गारठली, जागोजागी पेटल्या शेकोट्या गोदापट्ट्यात डिग्रस बंधार्‍यातील बॅकवॉटरमुळे थंडीचा जोर अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन गारठले असून दिवसासुद्धा जागोजागी शेकोट्या नजरेस पडत आहे. सायंकाळी 7 वाजल्यानंतर अघोषित संचारबंदीसदृश स्थिती पहावयास मिळत आहे. 

थंडी ही रबी पिकांसाठी पोषक असली तरी सकाळची शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. खरबडा, वझूर,  देऊळगाव, देवठना, गोळेगाव आदी गावे नद्यांलगत असल्याने या भागात थंडीचा जोर अधिक आहे. संपूर्ण दिवसभर झोंबणारी थंडी, बोचरे वारे यामुळे गारठा आणखी जाणवत आहे. सायंकाळी 7 वाजले की गावातील रस्त्याने कुणीही फिरकताना दिसत नाही. दारे-खिडक्या बंद करून कोंडून घेण्याची वेळ आली आल्याची भावना म्हातारी मंडळी व्यक्त करीत आहे. कुडकुडणार्‍या थंडीत शिक्षक वेळेवर येत असले तरी विद्यार्थी शाळेत येण्याचा कंटाळा करीत आहेत. गहू, चना या पिकांसाठी थंडी आवश्यक असली तरी सकाळी ओलित करताना शेतकर्‍यांचे व मजुरांचे हात थरथर 
कापू लागले आहेत. त्यामुळे शेतातही पहाटे पहाटे शेकोट्या पेटायला सुरुवात होत आहे.