Mon, Sep 16, 2019 11:33होमपेज › Marathwada › बीड : कार- मोटारसायकलची समोरासमोर धडक; एक ठार

बीड : कार- मोटारसायकलची समोरासमोर धडक; एक ठार

Published On: May 03 2019 7:53PM | Last Updated: May 03 2019 7:53PM
गेवराई : प्रतिनिधी

कार व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्‍या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील कोळगाव बायपासवर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर मोटारसायकलने पेट घेतल्याने या आगीत मोटारसायकल जळून खाक झाली.

पाथर्डीकडून पाडळसिंगीकडे येणारी कार व परभणीकडून पाथर्डीकडे भरधाव वेगाने निघालेली मोटारसायकल यांची समोरसमोर जोरदार धडक झाली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील कोळगाव बायपासवर घडला. 

मोटारसायकल वरील दोघेही परभणी येथील रहिवासी असून ओव्हरटेक करताना मोटारसायकल कारवर जाऊन धडकल्याचे प्रथमदर्शनींनी सांगितले. हा अपघात ऐवढा भिषण होता की, दुचाकी चालवणाऱ्या तरुणाच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला, तर पाठीमागे बसलेल्या तरुणाला गंभीर मार लागला आहे. 

कोळगाव येथील तरुणांनी १०८ रुग्णवाहिकेतून त्याला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने यामध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन पगार यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळाकडे पाठवून दिले आहे. अपघातातील मृत व जखमीचे वेळेअभावी नाव कळू शकले नाही. दोघांचेही वय तीसच्या आसपास आहे.