Sat, Jun 06, 2020 16:16होमपेज › Marathwada › भाजपला मतदान न करण्याची विद्यार्थ्यांची शपथ

भाजपला मतदान न करण्याची विद्यार्थ्यांची शपथ

Published On: Feb 17 2018 5:56PM | Last Updated: Feb 17 2018 7:41PMबुलडाणा : प्रतिनिधी

पोलिस भरतीची जाहिरात निघत नसल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदण यांच्या नेतृत्वात 700 विद्यार्थ्यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरु केला आहे. सत्याग्रहाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.

आज (17 फेब्रुवारी) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी भेट देऊन राणा चंदन आणि विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. सरकारने भर्तीची जाहिरात काढली नाही तर भाजपला मतदान न करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाणा दौऱ्यावर असतानाही त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे.

यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, सरकारने 12 हजार पोलीस शिपाई पदाची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येऊन या सरकारला चार वर्ष झालीत मात्र, राज्यात कोठेही पोलीस भरती झाली नाही. पोलिस विभागात पोलिसांच्या हजारो जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमुळे पोलिसांवर ताण येत आहे हे सरकारला दिसत नाही का? सरकारने तातडीने पोलीस शिपाई पदाची भरती घेऊन तरुणांना न्याय द्यावा अन्यथा राज्यभरातील बरोजगार तरुण रस्त्यावर उतरतील.   

तुपकर यांनी आपल्या खास वऱ्हाडी शैलीत आक्रमक भाषण करीत सरकारवर चौफेर टिका केली. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारने वेळीच जागा भरल्या नाहीत तर भाजपला मतदान करायचे नाही अशी तुपकरांच्या उपस्थितीत शपथ घेतली.