Mon, Jun 01, 2020 18:48
    ब्रेकिंग    



होमपेज › Marathwada › बीडमध्ये हजारो रोमियोंवर कारवाई; तरीही छेडछाडीचे सत्र सुरुच

बीडमध्ये हजारो रोमियोंवर कारवाई; तरीही छेडछाडीचे सत्र सुरुच

Published On: Jan 29 2019 4:36PM | Last Updated: Jan 29 2019 4:36PM




बीड : शिरीष शिंदे  

महाविद्यालयीन, शाळेतील मुलींनी न घाबरात छेडछाड करणार्‍या मुलांची पोलिसांकडे तक्रारी करावी, यासाठी जिल्हाभरात दामिनी पथकाद्वारे  नेहमीच सेमिनार, कार्यक्रम घेतले जात आहेत. दामिनी पथकांद्वारे मागील वर्षभरात जवळपास 2 हजार 700 रोडरोमियोंवर कारवाई केली आहे. परंतु शहरासह तालुक्यांच्या ठिकाणी मुलींना त्रास दिला जात असल्याचे समोर येत आहे. वडवणी तालुक्यातील एका मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा प्रकार हा टवाळखोर मुलांवर पोलिसांचा दरारा नसल्याचे द्योतक आहे.

रोडरोमियांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या द्वारे शाळा, महाविद्यालयात कार्यक्रम घेऊन मुलींनी टवाळखोर मुलांवर कारवाईसाठी न घाबरता निनावी तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. तसेच मुलींना इमर्जन्सीमध्ये तक्रार करण्यासाठी दामिनी पथकातील कर्मचार्‍यांचे मोबाईल नंबरही दिले जात आहेत. त्या आधारावर पोलिसांना संपर्क करून मुली तक्रारी करत आहेत. त्यानुसार कारवाईही होत आहे, मात्र छेडछाडीचे प्रकार थांबत नाहीत. वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथील स्वाती राठोड या मुलीने छेडछाड होत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार संबंधित मुलांना पोलिसांनी समजही दिली होती मात्र त्यांनी छेडछाड सुरुच ठेवली. यातून स्वातीने आत्महत्येसारखे पाऊल उचलेले.

दरम्यान,केज शहरातील एका विद्यार्थिनीला खासगी शिकवणीच्या शिक्षकाने क्लासेसवर बोलावून घेतले. एका विद्यार्थ्याने व शिक्षकाने मुलीची छेड काढली. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर संतापलेल्या पालकाने सदर शिक्षकाच्या अंगावरील कपडे काढून मनसोक्त धुलाई करून क्लासेसपासून पोलिस ठाण्यापर्यंत अर्धनग्न धिंड काढली व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार केज शहरात सोमवारी (दि.28) रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी शिक्षकासह त्या विद्यार्थ्याविरुध्द केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे प्रकार होत असल्याने मुलींमध्ये अस्थिरता निर्माण होत आहे.

2700 रोमिओंना दामिनीचा दणका

 पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एका जिल्हा पथकासह 11 तालुक्यांमध्ये एक दामिनी पथक स्थापन केले आहे. त्यात एका अधिकार्‍यांसह तीन कर्मचारी पथकात नियुक्त आहेत. जिल्ह्यातील दामिनी  पथकातील कर्मचार्‍यांनी महिला व मुलींची छेड काढणार्‍या जवळपास 2700 रोमिओंवर कारवाई केली आहे. ही आकडेवारी जानेवारी ते डिसेंबर 2018 दरम्यानची आहे. कारवायांबरोबरच शाळा, महाविद्यालये, बचतगटांना भेटी देऊन सुरक्षिततेबद्दल विश्वासही दिला जात आहे. बारा महिन्यात जवळपास 2700 रोडरोमिओंना पकडून चोप दिला आहे. तसेच 139 जणांना न्यायालयात पाठविले आहे. ठाणे प्रभारींनी 2265 रोमिओंना ताकीद दिली. त्यांच्याकडून 65 हजार 160 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. कारवायांबरोबरच 2303 शाळा, महाविद्यालये, 434 महिला बचतगटांना भेटी देऊन सुरक्षिततेबद्दल जाणीव करुन देण्यात आली आहे.