Thu, Oct 17, 2019 06:04होमपेज › Marathwada › बीड तालुक्यात स्त्री अर्भक सापडले

बीड तालुक्यात स्त्री अर्भक सापडले

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 1:18AMबीड : प्रतिनिधी

तालुक्यातील मैंदा शिवारातील एका शेतात स्त्री जातीचे अर्भक गुरुवारी सकाळी आढळून आले. ग्रामस्थांनी तत्परतेने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्या चिमुकलीस दाखल केले. त्यामुलीची बोटे उंदराने कुरतडल्याचा प्राथमिक अंदाज डॉ. हनुमंत पारखे यांनी वर्तविला. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, बाळाला फे कून देणार्‍या निर्दयी मातेचा शोध सुरू आहे. 

बीडपासून काही अंतरावर असलेल्या मैंदा शिवारातील लक्ष्मीनगर वस्ती येथील लालासाहेब घुमरे यांच्या शेतामध्ये पळाट्याच्या फासात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. घुमरे यांनी तेथे जाऊन पाहिले असता एक नवजात अर्भक रडत असल्याचे, त्यांना दिसून आले. घुमरे यांनी या घटनेची माहिती तत्काळ ग्रामस्थांना दिली.  गावातील उत्रेश्‍वर घुमरे, बाबासाहेब घोरड, सीताराम उंबरे, ग्रामसेवक बाबासाहेब घुमरे, भैय्या घुमरे, चंद्रकांत घुमरे, बाळासाहेब घुमरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यावेळी त्यांना जिवंत अवस्थेतील स्त्री जातीचे अर्भक  दिसून आले. त्या अर्भकाच्या एका हाताचे बोटे उंदराने कुतरडल्याची शंका उपस्थितांनी केली. जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी अर्भकास दाखल केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात तत्काळ रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक काळे हे तपास करीत आहेत. 

एक दिवसाचे अर्भक : जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत पारखे म्हणाले की, बाळाच्या अंगावर काही जखमा आहेत. बाळाच्या परिस्थितीवरून त्याचा जन्म एक दिवसापूर्वी असल्याचा अंदाज आहे. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.