Wed, May 27, 2020 12:12होमपेज › Marathwada › बीड : नवनियुक्त आमदार रमेश कराडांसह २२ जणांवर गुन्हा दाखल

बीड : नवनियुक्त आमदार रमेश कराडांसह २२ जणांवर गुन्हा दाखल

Last Updated: May 22 2020 9:53AM
परळी : पुढारी वृत्तसेवा 

गोपीनाथ गड येथे भाजपचे नावनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्य रमेश कराड यांनी काल (दि.२१) सकाळी ११.३०च्या सुमारास स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारून जमाव करून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह २२ जणांवर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नाईक विष्णू सुबराव घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटल्याप्रमाणे, आ. रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलिस प्रशासनास कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानकपणे दर्शनास येऊन लोक जमा केले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड, डॉ. बाळासाहेब कराड, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, दिनकर मुंडे, (सर्व रा.परळी), विठ्ठल मुंडे (रा.लिंबोटा) यांच्यासह १० ते १५ लोक होते. या सर्वांना कोरोना विषाणूचा संसर्ग पसरेल, ही माहिती असतानाही जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे व प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले. म्हणून त्यांच्या विरोधात वरिष्ठांच्या सूचनेवरून घुगे यांनी फिर्याद नोंदवली.

या प्रकरणी कलम १४३, १८८, २६९, २७०, २७१ भा.दं.वि.स. सह कलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शहाणे करत आहेत.