Thu, Jun 04, 2020 23:31होमपेज › Marathwada › डॉ. प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणा-या काँग्रेस कार्यकर्त्यांस मारहाण 

डॉ. प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणा-या काँग्रेस कार्यकर्त्यांस मारहाण 

Published On: Mar 27 2019 8:33PM | Last Updated: Mar 27 2019 8:45PM
बीड : प्रतिनिधी 

बीड लोकसभेच्या भाजप उमेदवार डॉ.प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर  आक्षेप घेणा-या  काँग्रेसच्या कार्यकर्त्यास भाजप पदाधिकार्‍यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. दादासाहेब मुंडे असे काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. मारहाणीनंतर दादासाहेब मुंडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.  पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार मारहाण झाल्याचा आरोप दादासाहेब मुंडे यांनी केला आहे.

लोकसभा उमेदवाराच्या आर्जाची छाननी बुधवारी होती. या दरम्यान काँग्रेसचे दादासाहेब मुंडे यांनी भाजपाच्या उमेदवार प्रितम मुंडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. याची सुनावनी आज चार वाजता झाली. दादासाहेब मुंडे यांचा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी फेटाळल्यानंतर ते कार्यालयाच्या बाहेर येत असताना गेटमध्ये त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण होत असताना पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत होते. या घटनेने एकच खळबळ उडाली.

पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार आपणास मारहाण झाल्याचा आरोप दादासाहेब मुंडे यांनी केला आहे. यापूर्वीही आपल्यावर अनेक हल्ले झाले आहेत. गाडी पेटवून देण्यात आली होती. यात एलसीबीचे पीआय घनश्याम पाळवदे यांचा देखील हात असून ते संधीच्या शोधातच असतात असेही दादासाहेब मुंडे यांनी सांगितले. 

सर्व आक्षेप अर्ज फेटाळले

प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर कालिदास आपेटसह दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप अर्ज दाखल केले होते. या अर्जावर दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावनी झाली असता सर्व अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी फेटाळून लावले.