Sun, Jun 07, 2020 14:52होमपेज › Marathwada › तुरीच्या पाठोपाठ हरभरा केंद्रही बंद 

तुरीच्या पाठोपाठ हरभरा केंद्रही बंद 

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 10:28PMवडवणी : अशोक निपटे

अगोदरच अनेक  शेतकर्‍यांच्या तुरी घरात ठेवून तूर खरेदी केंद्र बंद करणार्‍या शासकीय खरेदी यंत्रणेने आता अनेकांचे हरभर्‍याचे मापे होणे बाकी असताना खरेदी केंद्र बंद केले आहे. त्यामुळे वडवणी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वडवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली बीड जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत दोन फेब्रुवारी पासुन तूर खरेदी करण्यात आली. पंधरा मे पासून तुरीचे मापे घेणे बंद  आहे. हजारो शेतकर्‍यांची तूर अजूनही घरात पडून आहे. त्यातच 25 मे पासून याच खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी सुरू झाली आहे. सुमारे पाचशे शेतकर्‍यांनी हरभरा खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदी केल्या आहेत, मात्र मंगळवारी सायंकाळी हरभरा केंद्र बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. हरभरा खरेदीची मुदत संपली आहे, असे येथील केंद्र संचालकाने सांगितले. अनेकांचे मापे होणे बाकी आहे. 

मेसेजच आले नाही

वडवणी तालुक्यातील पाचशे शेतकर्‍यांनी हरभरा खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदी केल्या आहेत. मंगळवार पर्यंत  येथील तूर खरेदी केंद्रावर केवळ सव्वादोनशे शेतकर्‍याचे मापे झाले आहेत. उर्वरित शेतकर्‍यांना मेसेजच पाठविले नाहीत. 

सर्व शेतकर्‍यांचा हरभरा घ्या

वडवणी तालुक्यातील शेतकर्‍यांचे मापे होणे बाकी असताना हरभरा खरेदी केंद्र बंद करणे चुकीचे आहे. सर्व शेतकर्‍यांच्या हरभर्‍याचे मापे घेण्यात यावेत अशी मागणी मोरवडच  चेअरमन नारायणराव शेळके यांनी केली आहे.