Sun, Jun 07, 2020 08:33होमपेज › Marathwada › बाजार समित्या ठरल्या पैशांचे कुरण

बाजार समित्या ठरल्या पैशांचे कुरण

Published On: Jan 26 2018 1:18AM | Last Updated: Jan 26 2018 12:22AMहिंगोली : गजानन लोंढे

सहकाराच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे हित साधण्याच्या चर्चा राजकारण्यांकडून केल्या जात असल्या तरी, हिंगोलीत मात्र सहकारातील दिग्गजांनी शेतकरी हिताला बाजूला सारत बाजार समितीच्या माध्यमातून अर्थकारणालाच जास्त महत्त्व दिले आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या हिंगोली बाजार समितीचे सभापती हरिश्‍चंद्र शिंदे यांना 50 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडल्यामुळे जिल्ह्याचे सहकार क्षेत्र बदनाम झाले आहे. या घटनेमुळे सत्ताधारी भाजपलाही मोठा हादरा बसल्याचे पाहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात दोन महत्त्वाच्या बाजार समित्या म्हणून हिंगोली व वसमत बाजार समितीकडे पाहिले जाते. त्या हळदीसाठी राज्यात प्रसिद्ध असल्यामुळे कोट्यवधीची उलाढाल होत असते. या समित्यांवर वर्चस्व राहावे यासाठी सर्वच पक्षांची धडपड असते. हिंगोली बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व राहावे यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी काही दिवसांपूर्वीच आपले नातेवाईक असलेले हरिश्‍चंद्र शिंदे यांची वर्णी लावली, परंतु अवघ्या काही महिन्यांतच सभापती शिंदे यांना 50 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडल्यामुळे बाजार समितीतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला. सहा महिन्यांपूर्वीच वसमत बाजार समितीचे माजी सभापती राजू नवघरे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या बाजार समितीत राष्ट्रवादीच्या दुसर्‍या गटाने अविश्‍वास दाखल करून राजेश पाटील इंगोले यांची सभापती पदावर वर्णी लावली. याही मागे मोठे अर्थकारण
दडल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत बाजार समितीमध्ये होत असल्याच्या कोट्यवधींच्या उलाढालीपोटी सर्वच राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांचे बाजार समितीमधील आर्थिक व्यवहारामध्ये वाढलेला हस्तक्षेप शेतकर्‍यांच्या हिताला बाधा आणणारा ठरत आहे.

सुविधांच्या नावाने बोंब
हिंगोली बाजार समिती यार्डात शेतकर्‍यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. शेतकर्‍यांना आपला माल रस्त्यावर टाकावा लागतो. शेड उपलब्ध नसल्यामुळे पावसाळ्यात माल भिजून मोठे नुकसान होते. शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी संचालक मंडळ अर्थकारणाला महत्त्व देत आहे. हिंगोली बाजार समितीमध्ये नुकतेच गाळे काढण्यात आले. यात मोठ्या अर्थकारणाची चर्चा झाली. संचालक मंडळाच्या हिताचे निर्णय मात्र तत्काळ घेतल्या जात असल्यामुळे हिंगोलीत सहकार वेगळ्या दिशेने जात असल्याचे दिसून येते. अनेक वर्षांपासून हिंगोलीच्या मोंढ्याच्या जागेचा प्रश्‍न शासनदरबारी धूळखात पडून आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची मोठी कुंचबणा होत आहे. एकीकडे बाजार समितीचा विकास करण्याबाबत कायम चर्चा केली जाते, तर दुसरीकडे बाजार समितीत होत असलेल्या आर्थिक उलाढालीवर डोळा ठेवला जातो. व्यापार्‍यांशी संगनमत करून शेतकर्‍यांना लुटण्याचे काम राजरोस सुरू आहे.

खरेदी-विक्री संघातही घोळ
येथील खरेदी-विक्री संघावर भाजपचे वर्चस्व असून विद्यमान अध्यक्ष गोविंद भवर यांनी तूर खरेदीत शेतकर्‍यांची लूट केल्याची ओरड मागील अनेक दिवसांपासून होत असताना उडीद व मुगाच्या खरेदीतही मोठा घोळ घातल्याचे समितीच्या अहवालावरून सिद्ध झाले आहे. हिंगोली तालुका खरेदी -विक्री संघाच्या कारभारावरून मागील महिनाभरापासून सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठली असताना अद्यापही त्यावर निर्णय होत नसल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्‍त केला जात आहे. शेतकर्‍यांसाठी तब्बल 1 कोटी 63 लाख रुपये उपलब्ध होऊनही यादीच्या घोळामुळे ते पैसे शेतकर्‍यांना वाटप केले जात नसल्याचा प्रकार घडत असल्याने सत्ताधारीच शेतकर्‍यांना नागविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.