Fri, May 29, 2020 03:19होमपेज › Marathwada › एटीएममध्ये खडखडाट, ग्राहकांचे हाल

एटीएममध्ये खडखडाट, ग्राहकांचे हाल

Published On: Aug 27 2018 1:15AM | Last Updated: Aug 26 2018 11:41PMबीड : प्रतिनिधी

सणासुदीचे दिवस असल्याने बीडमध्ये खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर आले होते, मात्र शहरातील वीसपेक्षा अधिक एटीएममध्ये शनिवारी व रविवारी अशा दोन्ही दिवशी खडखडाट होता. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आल्या पावली परतावे लागले. अनेक ग्राहक या एटीएमवरून त्या एटीएमवर धावाधाव करीत होते, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली.

शनिवार व रविवारी आशा दोन दिवस सलग बँकांना सुटी होती. त्यामुळे आपल्या खात्यावरून पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी एटीएमवर मोठी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी अनेक एटीएमवर गर्दी दिसून आली, मात्र दुपारी 12 नंतर एटीएममधील कॅश संपली होती. त्यामुळे ग्राहकांना आल्या पावली परतावे लागले.

रविवारी रक्षाबंधन असल्याने बीड शहरासह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मार्केटमध्ये आले होते. सणाच्या खरेदीसह इतर खरेदीही नागरिकांना करावयाची होती. सध्या जवळपास बहुतांश बँक ग्राहक एटीएमचा वापर करतात. त्यामुळे अनेकांनी बीड शहरातील जालना रोड, बसस्थानक परिसर, नगररोड, स्टेडिअम परिसर, मोंढा रोड, डीपी रोड, सुभाष रोड, माळीवेस, पेठ बीड आदी भागातील एटीएमवर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती, मात्र बहुतांश एटीएमवर खडखडाट होता. सुभाष रोड, स्टेडिअम परिसर, मोंढा रोड, डीपी रोड, जालना रोड या भागातील तर एकाही एटीएममध्ये रविवारी दिवसभर पैसे नव्हते. त्यामुळे ग्राहकांना मोठे हाल सहन करावे लागले. शहरातील एटीएममध्ये सतत पैसे ठेवण्याची मागणी एटीएम ग्राहकांतून होत आहे.