Fri, May 29, 2020 02:52होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास कामकाज चालू देणार नाही : मुंडे

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास कामकाज चालू देणार नाही : मुंडे

Published On: Nov 11 2018 1:53AM | Last Updated: Nov 11 2018 1:53AMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

राज्यात यावर्षी 1972 पेक्षा भीषण दुष्काळ असल्याने शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत देण्याची गरज आहे. ही मदत अधिवेशनापूर्वी न दिल्यास अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

मुंडे मागील 4 दिवसांपासून दुष्काळी भागाचा दौरा, गावकर्‍यांशी चर्चा व शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर व पट्टीवडगाव सर्कलमधील 42 पेक्षा जास्त  गावांमधील नागरिक, शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

2013 मध्ये आलेल्या नैसर्गिक संकटाच्या वेळी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने हेक्टरी 25 हजार रूपये मदत दिली होती. यावेळी त्यावेळेपेक्षा यंदा अधिक बिकट परिस्थिती असल्याने यावेळी 50 हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. मदत न मिळाल्यास अधिवेशन चालू न देण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मागच्या वर्षीचे बोंडअळीची नुकसान भरपाई, वीज बिल माफ, 100 टक्के कर्जमाफीची अंमलबजावणी आणि मागेल तिथे टँकर, दावणीला चारा आदी मागण्याही त्यांनी केल्या. बीड जिल्हा बँक शेतकर्‍यांच्या पीक विम्याच्या पैशांवर व्याज खात आहे. त्यांची ही कृती म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली. 

यावेळी ज्येष्ठ नेते किसनराव बावणे, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, माऊली जाधव, शिवहार भताने, बाळासाहेब देशमुख, तानाजी देशमुख, गणेश देशमुख, मच्छिंद्र वालेकर, मुस्ताक पटेल, पांडुतात्या हारे, शिवाजीराव सिरसाट, बळवंतराव बावणे, बाळासाहेब राजमाने, गंडले, चंद्रकांत वाकडे, विश्‍वंभर फड, सत्यजित सिरसाठ, धनंजय शिंदे, चंद्रकांत चाटे, काशिनाथ कातकडे व परिसरातील सर्व सरपंच, घाटनांदूर येथील ग्रा. पं. सदस्य, शेतकरी, नागरिक आदी उपस्थित होते.