Sun, Jun 07, 2020 14:06होमपेज › Marathwada › नाहीतर पवारांची औलाद नाही : अजित पवार

नाहीतर पवारांची औलाद नाही : अजित पवार

Published On: Jan 17 2018 8:37PM | Last Updated: Jan 17 2018 8:37PM

बुकमार्क करा
उस्मानाबाद : प्रतिनिधी

‘‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो, राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप  देईन. नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही,’’ असा जबरदस्त आशावाद माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमच्या जाहीर सभेत व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेचा आज दुसरा दिवस होता.  भूम येथे जाहीर सभा पार पडली यावेळी अजित पवार बोलत होते. तुळजापूरच्या आई भवानीचे दर्शन घेऊन सुरु झालेल्‍या हल्लाबोल यात्रेला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. या सभेला अजित पवार, राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, रामराव वडकुते, आमदार विद्या चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, जीवनराव गोरे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, सुरेखा ठाकरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफार मलिक आदी उपस्थित होते.

अजित पवार म्‍हणाले, ‘‘आम्ही शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली परंतु, या सरकारने अजुनपर्यंत कर्जमाफी दिलेली नाही. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. या सरकारच्या कालावधीत पहिल्यांदा शेतकरी संपावर गेला आहे. या सरकारचे प्रतिनिधी कर्जमाफी करण्यासंदर्भात पवार साहेबांचा सल्ला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पवार साहेबांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा असे सांगितले होते. मात्र त्यांनी आपल्या निर्णयामध्ये बदल केले आणि त्यानंतर कर्जमाफीची काय अवस्था आहे. सगळेच शेतकरी माझे, मग प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव कशासाठी परंतु, हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव करताना दिसत आहे.’’ असा आरोप अजित पवार यांनी केला.

ते म्‍हणाले, ‘‘आज कुठल्याही निवडणूका आलेल्या नाहीत परंतु, आपण एकत्र आलो आहोत. आपला शेतकरी मोडला तर, राज्य उध्वस्त होईल. बाजार उध्वस्त होईल आणि आर्थिक कंबरडे मोडून पडेल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन सुरु केले  आहे.’’

अजित पवार यांनी  सरकारच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावरही टीका केली. ते म्‍हणाले, ‘‘राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचा घाट हे सरकार घालत आहे. कुठे घेवून चाललाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आली आहे.’’

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये भाजप-शिवसेना सरकारवर ताशेरे ओढले. शिवसेना पक्ष कसा चुकीच्या पध्दतीने जातोय याचे उदाहरणासह दाखले दिले. आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्दयांना हात घातला आणि ते मुद्दे कशापध्दतीने सोडवले गेले पाहिजेत याची गणितेही मांडली. शिवाय पत्रकारितेला मॅनेज करण्याची भाषा या सरकारकडून कशी होत आहे त्यामुळे लोकशाहीच्या या घटकाला कशी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे लोकशाही कशी टिकणार, कसा सव्वा कोटीचा देश पुढे जाणार असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कारभारावर टिकेची झोड उठवली.

पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक म्‍हणाले, ‘‘हे सरकार शेतकऱ्यांची छळवणूक करत आहे. त्यांच्याशी बेईमानी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्नासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे. ही हल्लाबोल यात्रा जनतेची आहे. त्यामुळेच ही हल्लाबोल यात्रा एक मोठे रुप धारण करत असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. 

‘‘सरकारने ऑनलाईन कर्जमाफी जाहीर केली मात्र, ऑनलाईन घोटाळ्यामुळे एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही मिळाला नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ऑनलाईनचे बोगस काम करणाऱ्या इनोवेव्ह कंपनीला १०० कोटी रुपये दिल्याचा आरोप विधानपरिशदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. सरकारने जाहिरातीवरही ३०० कोटींची उधळपट्टी केल्याचा आरोप करताना भाजप-सेना हे दोन जनतेला भासवणारे महा ठग असल्याचा टोला मंडे यांनी लगावला.