Sun, Jun 07, 2020 07:54होमपेज › Marathwada › उसाच्या गाडीला धडक; बैल दगावले 

उसाच्या गाडीला धडक; बैल दगावले 

Published On: Jan 03 2019 12:34AM | Last Updated: Jan 02 2019 11:54PM
गेवराई : प्रतिनिधी

ऊस टायरच्या बैलगाडीला समोरून भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्हीही बैल जागीच ठार झाले. ही घटना गेवराई तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी जवळ बुधवार पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. तर गढी येथील कारखान्याचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.

तालुक्यातील गढी येथील रहिवासी असलेले रामा नाकाडे हे यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पहिल्याच वेळी ऊसतोडणी करत आहेत. ते गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखाना येथे टायर बैलगाडी च्या माध्यमातून गेल्या दोन अडीच महिन्यापासून नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता उठून लवकर ऊसतोडणी करून नंतर येथील कारखान्यात ऊस घालत असत. दरम्यान दैनंदिनी प्रमाणे बुधवारी रोजी पहाटे लवकर उठून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हिरापुर येथील एका शेतकर्‍यांच्या शेतात ऊसतोडणी करण्यासाठी आपले टायर बैलगाडी घेऊन पती-पत्नी जात होते. दरम्यान गढी पासून 3 कि.मी. अंतरावरील रांजणी जवळ गेले असता समोरुन पहाटेच्या साडेचार वाजण्याच्या सुमारास सुसाट वेगाने आलेल्या एका अज्ञात पिकअप वाहनाने सदरील टायरला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही बैलांना जबर धडक बसल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाले. या घटनेत रामा नाकाडे यांचे जवळपास दिड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असुन दुष्काळी परिस्थितीतच अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे संबंधित ऊसतोड मजुराचे डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलीस ठाण्याचे पोहेकाँ किशोर इंगोले व सहकारी पोलिस यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असुन अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचार्‍यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली असून पंचनामा केला आहे. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी ही पंचनामा करून बैलाचे पिएम केले आहे. या शेतकर्‍यांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघातात पती-पत्नीस कोणतीही दुखापत झाली नाही.