Fri, Sep 20, 2019 21:48होमपेज › Marathwada › हिंगोलीत मळणी यंत्रात तोल गेल्याने युवकाचा मृत्यू

हिंगोलीत मळणी यंत्रात तोल गेल्याने युवकाचा मृत्यू

Published On: Oct 04 2018 5:13PM | Last Updated: Oct 04 2018 5:13PMगोरेगाव (जि.हिंगोली) : प्रतिनिधी 

सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे १९ वर्षीय युवकाचा मळणी यंत्रात तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. मृत युवक हा सोयाबीनच्या सुडीवर उभा राहून मळणी यंत्रात सोयाबीनचे काड टाकत असताना डोक्यावरचा रूमाल मळणी यंत्रात अडकून रूमालासह त्यालाही मळणी यंत्रात ओढल्या गेल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

सेनगाव तालुक्यातील हाताळा येथील दत्ता सुभाष धामणकर (वय १९) हा गुरूवारी गावातील उत्तम हिरामण खिल्‍लारे यांच्या शेतात ट्रॅक्टरवरील मळणी यंत्रावर मजुरीने सोयाबीन काढणीसाठी सकाळी कामावर गेला होता. मळणीचे काम  सुरू असतानाच हातातील सोयाबीनचे काड मळणी यंत्रात टाकत असताना डोक्याला बांधलेला रूमाल काडासोबत मळणी यंत्रातील चाकाला अडकल्यामुळे फिरत्या चाकाने रूमालासह दत्ता धामणकर यास मळणी यंत्रात ओढला गेला. त्यांच्या इतर सहकार्‍यांनी धावपळ करून मळणी यंत्र बंद केले परंतु तो पर्यंत दत्ता मळणी यंत्रात अडकून मृत झाला होता. या घटनेची माहिती गोरेगाव पोलिसाना दिल्यानंतर गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कोरंटलू यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. तसेच मळणी यंत्र खोलून मृत दत्ता धामणकर यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. 

याप्रकरणी उशिरापर्यंत गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत दत्ता धामणकर यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. घरच्यांना हातभार म्हणून तो मजुरीचे काम करीत होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे हाताळा येथे हळहळ व्यक्‍त केली जात आहे.