होमपेज › Marathwada › जरोड्यात होणार 159 टीएमसी पाणीसाठा

जरोड्यात होणार 159 टीएमसी पाणीसाठा

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:18AMआखाडा बाळापूर ः विनायक हेंद्रे

कळमनुरी तालुक्यातील जरोडा गावात जलयुक्त शिवार व वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्यात आल्यामुळे गाव पाणीदार होणार आहे. जलसंधारणाच्या कामामुळे तब्बल 159 टीएमसी पाणीसाठा होणार आहे. यामुळे जरोडा गावातील दुष्काळ कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होणार आहे. पहिल्या पावसातच जलसंधारणाच्या कामात पाणी साचल्याने गावकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जलयुक्त शिवार व वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून उन्हाळ्यात ग्रामस्थांनी जरोडा शिवारात पंधरा शेततळे, 140 ढाळीचे बांध, तीन सिमेंट नाला बांध, एक पाझर तलाव, 87 लूझ बोल्डर ट्रक्चर आदी कामे केली. तसेच नवीन चाळीस सलग समतल चर, तीन सिमेंट नाला बांध, तीन मातीनाला बांध, 400 ढाळीचे बांध तसेच चार नाला खोलीकरणाचे कामे प्रस्तावित आहे. यातून गावकर्‍यांना 475 टीएमसी पाणी मिळू शकते. गावकरी व प्रशासन यांच्या समन्वयातून जलसंधारणाची दर्जेदार कामे झाली. पाण्याच्या ताळेबंद लक्षात घेऊन प्रशासनाने कामे केली आहे. गावाला 740 टीएमसी पाण्याची आवश्यक असून, पिकांसाठी 717 टीसीएम, पिण्यासाठी 23 टीएमसी पाणी लागते. ही गरज जलसंधारणाच्या कामातून भरून निघणार आहे. जलसंधारणाच्या कामामुळे जवळपास 83 टक्के पाणी अडविले जाणार आहे. ते पाणी जमिनीत मुरल्यामुळे पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. 

यात प्रामुख्याने जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड, आ.डॉ.संतोष टारफे, डॉ.सतीश पाचपुते यांच्यासह लोकप्रतिनिधींनीही श्रमदान केले.  दोन दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असून जलसंधारणाच्या कामामध्ये पाणी साचल्याचे दिसून येत आहे.